चित्रपट, उपाहारगृहे पुर्ण क्षमतेने सुरु, मात्र 'या' नियमाचे पालन करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:17 AM2022-03-04T11:17:25+5:302022-03-04T11:19:13+5:30
आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार
कोल्हापूर: जिल्ह्यातील चित्रपट आणि उपाहारगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी याबाबतचे आदेश काढले. आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना स्थिती आटोक्यात आलेल्या राज्यातील कोल्हापूरसह १४ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा बुधवारी केली होती. त्यानुसार रेखावार यांनी सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महापालिका आणि उर्वरित जिल्हा असे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
नवे नियम
- सार्वजनिक सेवा, वस्तू वितरण, व्यवस्था याचा पुरवठा करणारे आणि लाभ घेणाऱ्यांचे दोन्ही डोसचे लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
- सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्ययात्रा किंवा इतर जमावाच्या ठिकाणी कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत उपस्थितीस मुभा देण्यात आली आहे.
- सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन अध्यापनाला मान्यता. अंगणवाड्या, प्राथमिक शाळांनाही परवानगी
- सर्व व्यापारी संकुले, चित्रपट, उपाहारगृहे, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृहे, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क या ठिकाणी १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्यास परवानगी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कल्पना देणे बंधनकारक
धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी एक हजारापेक्षा अधिक जमाव जमणार असेल तर याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.