‘वाल्मीकी म्हेत्तर’ची परिवर्तनाकडे वाटचाल
By admin | Published: October 25, 2015 11:13 PM2015-10-25T23:13:24+5:302015-10-25T23:30:12+5:30
छत्रपती राजाराम महाराजांकडून आश्रय : जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देत नवनिर्मितीसाठी धडपड
राजाराम लोंढे - कोल्हापूर -पिढ्यान्पिढ्या साफसफाई करणारा कोल्हापूरचा ‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज परिवर्तनाकडे वाटचाल करीत आहे. पारंपरिक काम करताना प्रबोधनातून समाजाला शिक्षणप्रवाहात आणले जात आहे. मागासलेपणाचा डाग शिक्षणातूनच पुसला जाऊ शकतो, असा विश्वास या समाजाला आहे. सर्व सण, उत्सव अगदी आपलेपणाने साजरे करताना जुनाट रूढी-परंपरांना मूठमाती देण्याचे काम या समाजाने केल्याने खऱ्या अर्थाने या समाजाची नवनिर्मितीसाठी धडपड सुरू आहे.
‘वाल्मीकी म्हेत्तर’ समाज हा मूळचा जयपूर, राजस्थानमधील आहे. पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने हा समाज राजस्थानमधून पंढरपुरात आला. तिथे राहून तो साफसफाईचे काम करू लागला. कोल्हापुरात प्लेगची साथ आल्यानंतर येथील सफाई कामगारांनी मैला सफाईच्या कामाला नकार दिला होता. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज यांनी साफसफाईसाठी या समाजातील काही लोकांना कोल्हापुरात आणले. लक्ष्मीपुरी येथे त्यांना जागा देऊन कायमस्वरूपी निवारा दिला. तेव्हापासून हा समाज जिल्ह्यातील विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. कोल्हापूर शहरात संभाजीनगर, लाईन बझारासह जिल्ह्यात साधारणत: वीस हजार लोकसंख्या या समाजाची आहे.
या समाजाच्या वतीने वर्षभरात धर्मगुरू महर्षी नवल यांची जयंती, वाल्मीकी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. श्रावण महिन्यात भगवानवीर गोगादेव जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. संभाजीनगर येथील समाजमंदिरात सासनकाठी उभारली जाते. समाजातील तरुण श्रावणातील २१ दिवस कडक उपवास करतात. या काळात समाजातील चाळीस ते पन्नास तरुण दाढी करीत नाहीत, पायांत चपला वापरत नाहीत, महिलांनी शिजविलेले जेवण खात नाहीत. दिवसभर ते पूजा, भजन, कीर्तनात रंगून जातात. शेवटच्या दिवशी सासनकाठीसह मोठी मिरवणूक काढली जाते. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील समाज सहभागी होतो. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजनही केले जाते.
समाजात लग्न ठरविताना हुंडा मागितला अथवा दिलाही जात नाही. हुंडामागणीचा प्रकार कोठे होत असेल तर लगेच म्हेत्तर सकल पंचायतीच्या माध्यमातून त्यावर निर्बंध आणले जातात. काही कारणाने कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला तर तो सकल पंचायतीच्या माध्यमातून लगेच मिटविला जातो. अपघाताने एखाद्या महिलेला विधवा होण्याची वेळ आली तर तिच्या इच्छेनुसार पुनर्विवाह करून दिला जातो. म्हेत्तर समाजातील यासह इतर परंपरा अन्य
समाजाच्या दृष्टीने आदर्शवत मानल्या जातात.
कोल्हापूर जिल्हा म्हेत्तर सकल पंचायत कार्यकारिणी
के. पी. पचरवाल, राजू चंडाले, सुरेश आदिवाल, जयवंत गोडाळे, रामस्वरूप पटोणे, शिवाजी पटोणे, खैराती ढढोरे, सुभाष खरारे, राजू सांगरे, विजय कराले, सुनील लोट.
एकही उच्चशिक्षित नाही
समाजातील तरुणांनी पारंपरिक सफाईच्या कामाशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष न दिल्याने समाजात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा आला आहे. परिणामी एकही इंजिनिअर, वकील, आदी उच्च शिक्षण घेतलेला तरुण नाही; पण सध्या समाजात बऱ्यापैकी जागृती झाल्याने शिक्षणाबाबतचे मन परिवर्तन होण्यास मदत झाली आहे.
मुलींच्या जन्माचे स्वागत!
शासनाकडून भ्रूणहत्येबाबत प्रबोधन व जागृती सुरू आहे; पण ‘वाल्मीकी’ समाजात गेल्या अनेक वर्षांपासून मुलगीचा जन्म शुभ मानला जातो. मुलगी झाली की तिचे स्वागत केले जाते.
दाखल्यासाठी अडचणींचा डोंगर
आर्थिक टंचाईमुळे मुळात हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात जाऊ पाहत आहे. त्यासाठी त्यांना जातीच्या दाखल्यांची गरज आहे. हा समाज ‘अनुसूचित जाती’ या प्रवर्गात येतो; पण दाखल्यासाठी १९५० पूर्वीचा रहिवासी असल्याचा दाखला, प्रॉपर्टी कार्ड लागते. अद्याप ८० टक्के समाज महापालिकेच्या मालकीच्या व भाड्याच्या खोल्यांत राहत असल्याने दाखल्याबाबत तो काहीच पुरावे देऊ शकत नाही.