खासदार धैर्यशील मानेंना बेळगावात प्रवेश बंदी, कोगनोळी सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:51 PM2023-01-17T15:51:58+5:302023-01-17T15:52:41+5:30
कोगनोळी फाटा परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावला जाणार होते. याबाबत माहिती कळताच कर्नाटकने ताबडतोब त्यांना बेळगाव प्रवेश बंदी लागू करण्यात आली. बंदी लागू केली असतानाही माने हे बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील याला अटकाव म्हणून महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा परिसरात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यामध्ये कर्नाटकसह महाराष्ट्रातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांना अभिवादन करण्यासाठी सीमा भागामध्ये १७ जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. यासाठी सीमा भागासह महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावमध्ये उपस्थित राहतात.
महाराष्ट्रातील विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव मधील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे जाहीर केले होते. याची माहिती कळताच ताबडतोब कर्नाटक प्रशासनाने रात्री उशिरा त्याना बेळगाव प्रवेश बंदी लागू केली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे दूधगंगा नदी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.