इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:23 PM2023-08-21T12:23:19+5:302023-08-21T12:24:53+5:30
स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही.
कोल्हापूर: प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत; पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता आला नाही, हे त्यांचे खरे दुःख आणि मळमळ आहे, असे प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाव्दारे दिले आहे.
महाडिक पत्रकात म्हणतात, विकासाच्या केवळ गप्पा मारायच्या आणि आपणच खेळाडूंचे तारणहार आहोत, असा देखावा निर्माण करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांची भुलवणारी कार्यपद्धती सर्वांनाच माहीत आहे. खूनशी स्वभाव आणि राजकीय विद्वेषातून, या महाशयांनी आजवर अनेकांना धोका दिला आहे. म्हणूनच सूर्याजी पिसाळ ही त्यांना उपमा मिळाली. कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलेलं असताना, स्वत: टोलची पावती फाडून, माजी पालकमंत्र्यांनी ढपला पाडल्याची जाहीर कबुलीच दिली. त्यांना कोल्हापूरची जनता कधीच माफ करणार नाही.
स्वतः पंधरा वर्षे सत्तेमध्ये आणि आठ वर्षे मंत्री असताना, या महाशयांना इनडोअर स्टेडियम पूर्ण करावे, असे कधी वाटले नाही. वास्तविक ज्या इनडोअर स्टेडियमबद्दल माजी पालकमंत्री आता बोलत आहेत, त्याचा निधी सुमारे दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजूर केला. मात्र दीड वर्षात कोणतेही काम झाले नसल्यानेच, हा निधी राज्य शासनाने खेळाडूंच्या अन्य विकास कामांसाठी वळवला आहे.