Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 02:50 PM2024-08-24T14:50:01+5:302024-08-24T14:52:54+5:30
के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच..
कोल्हापूर: महाडिक आता कोंडी करून घेणार नाहीत. आम्ही भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्याचे तंतोतंत पालन केले जाईल, अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. ते शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. कागलमध्ये कालपर्यंत तुमच्यासोबत असलेल्या समरजित घाटगे यांच्याविरोधात कागलमध्ये जाऊन भाषण करताना तुमची कोंडी होणार नाही का, या प्रश्नावर महाडिक यांनी हे उत्तर दिले.
कागलमधील बदलत्या राजकीय स्थितीवर बोलताना ते म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात गेली १० वर्षे घाटगे हे काम करत आहेत. जेव्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत सत्तेत सहभागी झाली तेव्हाच हसन मुश्रीफ हेच उमेदवार हे निश्चित झाले. त्यामुळे घाटगे यांना आम्ही विनंती केल्यानंतरही त्यांनी काही वेगळा निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. आमचे तिन्ही ताकदीचे पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात काही ठिकाणी ज्यांना संधी मिळणार नाही, असे नेते वेगळा विचार करण्याची शक्यता आहे परंतु महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
के.पी.सह शिवाजी पाटील, हाळवणकर यांच्यापुढे पेच..
जिल्ह्याचा विचार करता अजून माजी आमदार के. पी. पाटील सोडून गेलेत असे म्हणता येणार नाही. चंदगडमध्ये शिवाजी पाटील यांचा प्रश्न आहे. इचलकरंजीत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचा मुद्दा आहे परंतु याबाबत ज्या काही गोष्टी व्हायच्या आहेत. त्या वरिष्ठ पातळीवर स्पष्ट केल्या जातील.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहरात इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे नियोजन होते. बसेस तयारही आहेत. जादा दहा, पंधरा मिळण्याचीही शक्यता आहे परंतु जोपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत या बसेस आणून उपयोग होणार नाही. ‘वंदे भारत’ऐवजी केंद्र सरकारने सध्या नियमित रेल्वे बोगी बांधणीला प्राधान्य दिल्याने ‘वंदे भारत’ला थोडा विलंब होईल, असेही महाडिक यांनी सांगितले.