महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:15 PM2023-06-19T18:15:03+5:302023-06-19T18:15:27+5:30

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग सुरू होणार

MP Dhananjay Mahadik's claim cautioned leaders of Mahavikas Aghadi, focused on disgruntled members of the party | महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

महाडिकांच्या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध, पक्षातील नाराजांवर लक्ष 

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले. महाडिक यांच्या या गुगलीने महाविकास आघाडीचे नेते सावध झाले असून, आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता, दुसऱ्या फळीतील काठावरील नेतेच उड्या मारणार आहेत, गडहिंग्लज उपविभागातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कारखान्यांचे माजी संचालकांची नावे चर्चेत आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचा धडाका सुरू होतो. सत्ता पाहून अनेक जण इकडून तिकडे उड्या मारत असतात. राज्यात २०१४ला भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये इतकी गर्दी झाली की आता प्रवेश नको, म्हणण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली होती. २०१९ला राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले आणि भाजपमध्ये गेलेल्यांची गोची झाली. त्यांचा महाविकास आघाडीचा संपर्क वाढू लागला, तोपर्यंत पुन्हा सत्तांतर झाले आणि भाजपचे सरकार आले.

जिल्ह्यात आगामी काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इनकमिंग सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित जिल्ह्यातील दिग्गज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची गुगली टाकली. यामुळे महाविकास आघाडीचे नेते सावध झाले आहेत.

माजी आमदारांचा प्रवेश अशक्यच

जिल्ह्यात सध्या विधानसभा व विधान परिषदेचे १९ माजी आमदार आहेत. त्यापैकी ५ भाजप, चार राष्ट्रवादी, पाच शिवसेना (ठाकरे गट), दोन काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शेकाप व जनता दल प्रत्येकी एक अशी संख्या आहे. दोन्ही काँग्रेसमधील माजी आमदारांपैकी कोणी भाजपच्या गळाला लागेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.

खरच पक्षाची ताकद वाढली का?

भाजपमध्ये २०१४ पासून अनेक ताकदवान नेत्यांनी प्रवेश केला. खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक हे वगळता इतरांचा पक्ष वाढीसाठी फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आणखी भरती करून खरच पक्षाची ताकद वाढणार की सत्तेची सूज तयार होणार? असा सवाल निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत.

Web Title: MP Dhananjay Mahadik's claim cautioned leaders of Mahavikas Aghadi, focused on disgruntled members of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.