कोल्हापूरचे खासदार चमकले... प्रश्न रेंगाळले...!
By admin | Published: May 26, 2016 01:04 AM2016-05-26T01:04:26+5:302016-05-26T01:05:20+5:30
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण : नव्या सरकारच्या काळातही जिल्ह्याच्या विकासाची पावले अडखळतच; राजकीय ताकदही कमी पडली
विकासात्मक पातळीवर शेट्टींची आघाडी
खासदार राजू शेट्टी यांनी दोन वर्षांत रस्ते, रेल्वे पूल आदीसाठी केंद्राकडून २०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवरील कोकण रेल्वे, रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणास मंजुरी आणून विदर्भ, मराठवाडा व कोकणाला पश्चिम महाराष्ट्र जोडण्यात, मिरज ते पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणास मंजुरीत महत्त्वाची भूमिका बजावली. जादा ऊस दरासाठी सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. निर्यात अनुदान, मळीवरील बंदी उठवून कारखानदारांना दिलासा दिला.
कोल्हापूर : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला आज, गुरुवारी दोन वर्षे होत आहेत. नव्या सरकारने लोकांना जी स्वप्ने दाखविली, त्यातील किती पूर्ण झाली हा संशोधनाचा विषय आहे. नव्या सरकारच्या काळात कोल्हापूरच्या विकासाचे पाऊल पुढे पडले का, याचा धांडोळा घेतल्यास त्यातून फारसे काही हाती लागत नाही. दोन्ही खासदार व्यक्तिगत पातळीवर चमकल्याचे दिसत असले तरी, कोल्हापूरच्या प्रश्नांना गती देण्यात त्यांना पुरेसे यश आलेले दिसत नाही. राजकीय ताकद कमी पडत असल्याचेच हे द्योतक आहे.
‘टॉप थ्री’ची महाडिकांना पोहोचपावती
एकेकाळी कोल्हापूरच्या खासदारांना उपहासाने ‘मौनीबाबा’ म्हटले जायचे. परंतु खासदारांची ही ‘मौनीबाबा’ची प्रतिमा धनंजय महाडिक यांनी प्रयत्नपूर्वक पुसून तर काढलीच; शिवाय संसदीय कामकाजातील ‘टॉप थ्री’ खासदारांच्या यादीत स्थान पटकावले, हीच त्यांच्या दोन वर्षांतील खासदारकीच्या कामाची पोहोचपावती म्हणावी लागते. खासदार महाडिक यांनी जिल्ह्यातील विकासकामांसाठी २१२ कोटींचा निधी खेचून आणण्यातही यश मिळविले. दोन वर्षांत त्यांनी ५३८ विषयांवर लोकसभेत भाषणे केली आहेत. त्यांचा शालेय विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्याचा विषय तर केंद्र सरकारतर्फे धोरण म्हणून स्वीकारला गेला. साखर उद्योगातील चढउतार आणि या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारला त्यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत.
निधी आणण्यातील अपयशाने पंचगंगा प्रदूषितच
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठीचा १०८ कोटी ९३ लाखांचा प्रकल्प अहवाल निधीसाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे वर्षापूर्वी पाठविण्यात आला होता. मात्र, निधी आणण्यात खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक यांना यश आले नाही. त्यामुळे अजूनही पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता आलेल्या नाहीत. नदीकाठावरील ३८ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. परिणामी नदीतील पाणी प्रदूषित होत आहे.
विकास आराखड्याच्या पुढे ‘उड्डाण’ नाहीच
देशातील लो-कॉस्ट विमानतळांमध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश करण्याचे काम भाजप सरकारकडून झाले आहे. विमानतळाच्या विकासाचा आराखडाही तयार केला आहे. त्यापुढे सरकारकडून काहीच पाऊल पडले नाही. विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले असले तरी विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन संपादित करण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठरावाचा मुद्दा दीड वर्षापासून अडखळला आहे.
‘आदर्श गाव’मध्ये खासदार नापास
केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावच्या सर्वांगीण विकासातही दोन्ही खासदार नापास झाल्याची प्रतिक्रिया संबंधित ग्रामस्थांमधून उमटत आहेत. गावचा कायापालट होईल यासंबंधी त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ सुरू केली. योजनेंतर्गत जिल्ह्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी पेरिड (ता. शाहूवाडी), कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द (ता. चंदगड), राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सोनवडे (ता. शाहूवाडी) गाव गेल्यावर्षी दत्तक घेतले. या योजनेतून गावची निवड झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
गावचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली; पण या योजनेसाठी स्वतंत्र असा निधी नाही. त्यामुळे विकासकामे करण्यावर मर्यादा आल्या. खासदार शेट्टी, खासदार महाडिक सध्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेतून काही विकासकामे केली आहेत; पण सर्वांगीण विकास झालेला नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे.