रायगडावरील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश, खासदार संभाजीराजे यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:50 AM2021-02-24T09:50:37+5:302021-02-24T09:52:59+5:30
Raigad Sambhaji Raje Chhatrapati - पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रायगड येथील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश खुला करण्याचा तत्काळ निर्णय रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी घेतला. त्यांनी रायगड किल्ल्यास भेट दिली.
कोल्हापूर : पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रायगड येथील राजसदरेवर शिवभक्तांना प्रवेश खुला करण्याचा तत्काळ निर्णय रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी घेतला. त्यांनी रायगड किल्ल्यास भेट दिली.
रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ या फरसबंद मार्गाची पाहणी केल्यानंतर हत्ती खान्याजवळ प्राधिकरणाचे कंत्राटदार, अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, महावितरण, बांधकाम विभाग आणि एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खासदार संभाजीराजे यांनी कामांची माहिती घेतली. सध्या सुरू असलेली कामे एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर या सदरेवरील बॅरिकेड्सचा विषय चर्चेस आला. त्यावर उपस्थित पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेत सदरेवरील बॅरिकेडस् हटवून शिवभक्तांना राजसदरेवर प्रवेश खुला केला. त्यावर उपस्थित शिवभक्तांनी जयघोष केला. गडावर प्राधिकरण व पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला होत असलेल्या उत्खनन जागांची खासदार संभाजीराजे यांनी माहिती घेतली. जगदीश्वर मंदिर फरसबंदीची, भूमिगत इलेक्ट्रिकल केबलचे काम, हत्ती तलाव, पायरीमार्ग कामाची पाहणी केली.
राजसदरेवर येताना शिष्टाचार पाळा
शिवभक्तांनी राजसदरेवर येताना शिष्टाचाराचे पालन करावे. या सदरेवर डाव्या बाजूने यावे आणि उजवीकडून उतरावे. तख्ताच्या जागेवर जाऊ नये. सेल्फी घेऊ नये. शांतता पाळावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले. तूर्तास हे बॅरिकेड्स् तख्ताच्या बाजूने लावले असून लवकरच याऐवजी ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.