संभाजीराजेंना मुदतवाढ की त्यांचा अन्य पक्षात प्रवेश? खासदारकीची मुदत जूनपर्यंत; पुढील राजकीय दिशा काय..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:58 AM2022-02-04T10:58:54+5:302022-02-04T11:19:39+5:30
मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असून, ते स्वत:ही या पक्षांच्या गुडबुकमध्ये
विश्वास पाटील
कोल्हापूर : राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत येत्या जूनमध्ये संपत आहे. भाजप त्यांना पुन्हा याच पदावर संधी देण्याची शक्यता फारच धूसर आहे. मराठा आरक्षणाचा विषय व मराठा समाजात त्यांच्याबद्दल क्रेझ असल्याने दोन्ही काँग्रेस त्यांच्या बऱ्यापैकी संपर्कात असून, ते स्वत:ही या पक्षांच्या गुडबुकमध्ये आहेत. त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह आहे.
संभाजीराजे यांची ११ जून २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी खासदार म्हणून नियुक्ती केली. केंद्रातील भाजप सरकारने त्यांना हा बहुमान दिला. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाच्या विस्तारासाठी उपयोग होईल, असा विचार करून त्यांना खासदार केले.
परंतु, संभाजीराजे हे कधीच भाजपच्या पक्षीय चौकटीत अडकले नाहीत. आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली हे मान्य करूनही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. त्यामुळे ते कधीच भाजपचे मांडलिक झाले नाहीत. कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत. मागील सहा वर्षांत तसे ते प्रमुख चार पक्षांसोबत समान अंतर ठेवून राजकीय व्यवहार करत आले आहेत.
खासदार म्हणून रायगडसह राज्यभरातील गडकोट किल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनावर ते सक्रिय राहिले. मराठा आरक्षण प्रश्नावर कितीही वाद-प्रतिवाद असले तरी बहुतांशी समाज ज्यांच्या नेतृत्वावर आजही विश्वास ठेवू शकेल, असे नेतृत्व म्हणून त्यांचेच नाव पुढे येते. त्यांना पुढे करून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला हादरे देण्याचा प्रयत्न मध्यंतरी भाजपकडून जरुर झाला.
परंतु, त्याला संभाजीराजे बळी पडले नाहीत. मराठा आरक्षणासह सारथीचे प्रश्नही अजून जैसे थे आहेत. राज्य सरकारने त्यांना दिलेली कमिटमेंटही पाळलेली नाही. त्यामुळे हे प्रश्न घेऊन त्यांनाही रस्त्यावर उतरावे लागणारच आहे.
पुढील राजकीय दिशा काय...
संभाजीराजे यांच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेवर जाऊ शकतात. परंतु, तूर्त राज्यसभेच्या जागा रिक्त झालेल्या नाहीत. विदर्भ-मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातही लोकबळ असलेला त्यांच्यासारखा नेता पक्षासोबत असावा, असे मुख्यत: राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही वाटते.
पर्याय असेही...
- पाच राज्यांतील निवडणुकीनंतर देशाच्या व राज्याच्या राजकारणातही काही उलथापालथी होणार आहेत. महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष कोणते सूत्र घेऊन लोकसभेला सामोरे जाणार, याबद्दलही सर्वच अनिश्चितता आहे.
- समजा काही वेगळे घडलेच तर ते कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून दोन्ही काँग्रेसचे उमेदवारही ठरू शकतात. परंतु, या घडामोडी आजतरी जर-तरच्या टप्प्यावर आहेत. महाविकास आघाडी एकत्रित सामोरे गेली तर त्यांना या पक्षाकडूनही राज्यसभेवर संधी मिळू शकते.