लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

By राजाराम लोंढे | Published: July 18, 2022 06:20 PM2022-07-18T18:20:35+5:302022-07-18T18:26:23+5:30

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही

MP Sanjay Mandlik and MP Darhysheel Mane will join Eknath Shinde group | लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

लोकसभेचे गणित पाहून संजय मंडलिक, धैर्यशील मानेंचे बंड; कोल्हापूकरकरांच्या पचनी पडणार?

Next

राजाराम लोंढे

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कमकुवत झालेली शिवसेना, त्यामुळे ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील बदललेली समीकरणे, देश पातळीवर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली ‘क्रेझ’ व जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसच्या ताकदीचा अंदाज घेऊन खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी बंडाचे निशाण हातात घेतले आहे. हे जरी खरे असले तरी राजकीय बंड कोल्हापूरच्या जनतेला फारसे पचनी पडत नसल्याचा इतिहासही आहे. त्यामुळे हे बंड यशस्वी होईल की नाही, हा येणारा काळच सांगेल.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात पहिल्यांदाच मंडलिक व माने यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकला. या विजयाला काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत झाली हेही विसरता येणार नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात महाविकास आघाडीबाबत कुरबुरी असल्या तरी कोल्हापुरात मात्र शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकदिलाने कारभार करत असल्याचे दिसले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कोल्हापुरात फारसे हादरे बसायचे नाहीत, असेच वाटत होते.

मात्र आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर व राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. या कालावधीत संजय मंडलिक, धैर्यशील माने, चंद्रदीप नरके यांनी सावधच भूमिका घेतली. आता मंडलिक व माने यांनी उध्दव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ केल्याने शिवसेनेला जोरात धक्का बसला असला तरी हे बंड कोल्हापूरकरांच्या पचनी किती पडणार, यावरच फलित अवलंबून आहे.

सरुडकर, उल्हास पाटील का थांबले...?

शिवसेनेच्या सहा माजी आमदारांपैकी राजेश क्षीरसागर हे उघड शिंदे गटात गेले. चंद्रदीप नरके हेही त्यांच्याच वाटेवर आहेत. डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेनेच्या बैठकीला येतात. संजय घाटगे यांचे अद्याप तळ्यात-मळ्यात आहे. सत्यजित पाटील-सरुडकर यांचे विरोधक आमदार विनय कोरे हे भाजपसोबत, तर उल्हास पाटील यांचे विरोधक राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटासोबत असल्याने त्यांना मूळ शिवसेनेसोबत राहण्याशिवाय पर्याय नाही.

हातकणंगलेचे गणित दिसते तितके सोपे नाही

पेठ वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे व विनय कोरे यांनी मोट बांधली आहे. जिल्हा बँकेत तर ही मोट अधिक घट्ट झाली. या तीन नेत्यांच्या जोडीला राजेंद्र पाटील-यड्रावकर असले तर हातकणंगले लोकसभेचे गणित सोडवणे अधिक सोपे जाईल, असे धैर्यशील माने यांना वाटत असले तरी हे गणित सोडवणे तितकेसे सोपेही नाही.

‘कोल्हापुरातून’ संजयबाबा की ‘के. पी.’

संजय मंडलिक यांनी जय महाराष्ट्र केल्याने ‘कोल्हापूर’मधून कोण, असा प्रश्न आहे. महाविकास आघाडी अशीच एकसंध राहिली तर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे नाव पुढे येऊ शकते. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे सख्य चांगले आहे. त्यात घाटगे यांचे इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्याशिवाय माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. ‘बिद्री’ साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. या कारखान्याचा प्रभाव कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांवर पडतो.

धैर्यशील यांच्या विरोधात शेट्टीच

हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी सध्यातरी चेहरा दिसत नाही. राजू शेट्टी यांनी आघाडीशी फारकत घेतली आहे. मात्र, ऐनवेळी माने यांना रोखण्यासाठी शेट्टींना पाठिंबा देऊ शकतात.

Web Title: MP Sanjay Mandlik and MP Darhysheel Mane will join Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.