एक मांडलिक झाले, दुसऱ्याच्या नावातच धैर्य, खासदार राऊत यांची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:02 PM2023-03-02T12:02:33+5:302023-03-02T12:03:10+5:30

गद्दारांच्या छाताडावर उभं राहून विजयाचा भगवा फडकवा

MP Sanjay Raut criticizes Sanjay Mandalik, Darhysheel Mane | एक मांडलिक झाले, दुसऱ्याच्या नावातच धैर्य, खासदार राऊत यांची बोचरी टीका 

एक मांडलिक झाले, दुसऱ्याच्या नावातच धैर्य, खासदार राऊत यांची बोचरी टीका 

googlenewsNext

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक हे तर मांडलिक झाले आणि दुसऱ्याच्या केवळ नावातच ‘धैर्य’ आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांवर बुधवारी बोचऱ्या शब्दात टीका केली. या गद्दारांच्या छाताडावर उभं राहून विजयाचा भगवा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १०३ आमदार निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. राऊत म्हणाले, या केशवराव भोसले नाट्यगृहात अनेक नाटके झाली आणि रंगलीही. आता महाराष्ट्रात परिवर्तनाचे महानाट्य घडवल्याशिवाय राहणार नाही. परवा अमित शाह कोल्हापुरात आले तेव्हा वाईट वाटलं. तुमच्या खासदारांना लिहिलेलं भाषणही वाचता येत नव्हतं. त्या आबिटकरांचं तोंडही आंबट करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व गद्दार मातीत गाडले जातील आणि विजयाचा रथ याच कोल्हापुरातून निघेल.

राऊत म्हणाले, रिक्षा चालवणाऱ्या, कोंबड्या चोरणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने मोठे केले. आमचा जन्म शिवसेनेत झाला म्हणून आम्ही आईवडिलांसोबत आहोत. परंतु या ४० जणांनी आईला विकले हे महाराष्ट्र विसरणार नाही. आता काय ५० खोके स्मशानात घेऊन जाणार आहात का..? तुम्ही शिवसेनेवर दरोडा घातलात. पण आमची हिंमत, जिद्द कशी चाेरणार..? शिवसेना आणि ठाकरे हा ब्रॅण्ड आहे. हा कोणीही संपवतो म्हणून संपणार नाही.

पावसाळ्यात गांडुळं दिसतात, छत्र्या दिसतात. मुख्यमंत्री कणेरी मठावर येऊन गेले आणि ५२ गायी मेल्या. दोन साधूंची हत्या झाली तर देशभर आम्हांला बदनाम करणाऱ्या कमळाबाईनं याबद्दल हूं की चूं केलं नाही. २०२४ला जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा पक्षाचे नाव आणि चिन्हाचा निकाल देणाऱ्याला चुना मळायला पाठवू.

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, एक रुपयाही खर्च न करता धैर्यशील माने खासदार झाले; पण तो पहिला गद्दार निघाला. ज्या उद्धव ठाकरेंनी सदाशिवराव मंडलिक यांना तुम्ही संजयची काळजी करू नका, असा शब्द दिला. तोदेखील गद्दार निघाला. करवीरची जनता नरकेंना धडा शिकवेल. यावेळी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, रवी इंगवले, सुनील माेदी, शुभांगी पोवार, तानाजी आंग्रे यांची भाषणे झाली. माजी आमदार सुरेश साळोखे, दत्ता टिपुगडे, शशी बिडकर, विनायक साळोखे, अवधूत साळोखे, सुप्रिया पाटील, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंजित माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कट्टर शिवसैनिक ग्रुपतर्फेही राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

नरके हे तर टेस्ट ट्यूब बेबी

माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणतात, आम्हाला उद्धव ठाकरेंनी जन्म दिला; परंतु एकनाथ शिंदेंनी सांभाळलं. कसा जन्म दिला. हे तर टेस्ट ट्यूब बेबी आहेत अशा भाषेत राऊत यांनी त्यांची संभावना केली. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज तरी आहे का ते पहा, असे ते म्हणताच जोरदार हशा पिकला.

गद्दारांचा केला उद्धार

या मेळाव्याला शिवसैनिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. प्रत्येक वक्त्यांच्या भाषणावेळी कार्यकर्ते खालूनच गद्दार, बंटी बबली, कोंबडीचोर, बोलका पोपट अशा शेलक्या विशेषणांनी पक्ष सोडलेल्यांचा उद्धार करत होते.

मी उत्तरमधून इच्छुक : संजय पवार

जिल्हाप्रमुख संजय पवार यांचेही यावेळी तडाखेबंद भाषण झाले. ते म्हणाले, लोक ईर्षेने बाहेर पडलेत. फक्त निवडणुकीपुरते आपल्याकडे येणाऱ्या लबाड लोकप्रतिनिधींपासून तुम्ही सावध राहा, हे आपल्याकडे येतात. गट बांधतात, गळ्यात भगवे उपरणे घालत नाहीत. ते केवळ आपली मते बघून आपल्याकडे येतात. दोन्ही लोकसभा, करवीर आणि कोल्हापूर उत्तर आपल्या वाट्याला घ्या. मी स्वत: कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक आहे. कोल्हापुरात फूट पाडून विष पेरायचं काम सुरू आहे. पण आम्ही कमळ फुलू देत नाही.

मुस्लीम समाजाचा पाठिंबा

वंचितमधून शिवसेनेत आलेले अस्लम सय्यद यांच्यासह कादर मलबारी यांनी राऊत यांचा सत्कार केला. यावेळी मलबारी म्हणाले, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मोडकळीस आणण्यासाठी ताकद लावली जात आहे. तसे होऊ नये म्हणून आम्ही जिल्ह्यातील मुस्लिमांनी मदारी म्हेतर होऊन उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 

Web Title: MP Sanjay Raut criticizes Sanjay Mandalik, Darhysheel Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.