मुंबईत शाहू छत्रपती-उद्धव ठाकरे यांची भेट, चार पिढ्यांतील संबधांना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 03:14 PM2024-06-11T15:14:58+5:302024-06-11T15:16:42+5:30
औदार्ह पाठिंब्याचे अन् कृतज्ञतेचेही..
कोल्हापूर : काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी कोल्हापुरात न्यू पॅलेसवर येऊन शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेवढे औदार्ह दाखविले, तेवढेच औदार्ह शाहू छत्रपती यांनी निवडून आल्यानंतर ठाकरे यांचे मातोश्रीवर जाऊन कृतज्ञता व्यक्त करून दाखविले. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी सकाळी झालेल्या गळाभेटीने या दोन कुटुंबातील चार पिढ्यांमधील स्नेहपूर्ण संबधांनाही उजाळा मिळाला.
महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या कोल्हापूर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित झाले होते. उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली होती. त्याच दरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगलीत जाहीर सभा होती. या सभेला जाण्यापूर्वी उजळाईवाडी विमानतळावरून थेट न्यू पॅलेस गाठले. त्यांनी शाहू छत्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तुमच्या प्रचार सभेलाही येणार असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांसमोर येऊन त्यांनी तसे स्पष्ट केले आणि मगच ते सांगलीकडे रवाना झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाकरे दि. १ मे रोजी झालेल्या जाहीर सभेस आले, तडाखेबंद भाषणही केले.
लोकसभेचा निकाल जाहीर झाला आणि शाहू छत्रपती दीड लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर शाहू छत्रपती सोमवारी सकाळी मुंबईतील ‘मातोश्री’वर पोहोचले. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानले. ही एक कौटुंबिक भेट असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यासह मालोजीराजे छत्रपती तसेच रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे असे मोजकेच सदस्य यावेळी उपस्थित होते. सुमारे तासभर गप्पा रंगल्या. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून आपणाला एकत्रित काम करायचे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.