Loksabha Election: शिंदे गटात पण कमळ घेणार हातात, कोल्हापुरातून मंडलिक, माने भाजपचेच उमेदवार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:44 PM2022-08-24T15:44:19+5:302022-08-24T15:45:44+5:30

केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री एस. पी. बघेल यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान या दोन्ही जागा भाजपच लढवेल, असे संकेत दिले आहेत.

MPs Sanjay Mandlik and Darhysheel Mane will be the likely candidates of BJP in the upcoming Lok Sabha elections | Loksabha Election: शिंदे गटात पण कमळ घेणार हातात, कोल्हापुरातून मंडलिक, माने भाजपचेच उमेदवार शक्य

Loksabha Election: शिंदे गटात पण कमळ घेणार हातात, कोल्हापुरातून मंडलिक, माने भाजपचेच उमेदवार शक्य

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे आगामी लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील भाजपचेच संभाव्य उमेदवार असतील अशा घडामोडी सुरू आहेत. दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री एस. पी. बघेल यांनी या दोन्ही जागा भाजपच लढवेल, असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरामध्ये शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. ते त्याच गटात राहणार असले तरी लोकसभेला कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असे चित्र दिसते.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी त्याचा निकाल लागतो की सीमाप्रश्नासारख्या नुसत्या सुनावण्याच होत राहतात, अशी शंका व्यक्त होत आहे. शिवसेनेला भगदाड पाडताना शिंदे गटाने लोकसभेच्या उमेदवारीचाही ‘शब्द’ भाजपकडून घेतला असण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या घडीला तरी दोन्ही मतदार संघांत भाजपकडे ताकदीचे उमेदवार नाहीत शिवाय मंडलिक-माने हेच कमळ चिन्ह मिळावे यासाठी अगतिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा व कमळ चिन्हाचा लाभ होऊ शकतो असा विचार करूनच त्यांनी शिंदे गटात उड्या मारल्या आहेत.

मित्रपक्षांना जागा द्यायच्या परंतु त्यांनी त्या कमळ चिन्हांवरच लढवल्या पाहिजेत, असा भाजपचा महाराष्ट्राच्या राजकारणातही यापूर्वी प्रयत्न राहिला आहे. रासपचे नेते महादेव जानकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनाही तसाच अनुभव आला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले गटाचे नगरसेवक हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

अठरा महिने..सहा दौरे..

हातकणंगलेसाठी केंद्रीय राज्यमंत्री बघेल यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूरसाठी अजून असा पालकमंत्री निश्चित झालेला नाही. कोल्हापूरसाठी स्थानिक समन्वयक म्हणून माजी आमदार सुरेश हाळवणकर तर हातकणंगलेसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, असे मंत्री या दोन्ही मतदार संघात पुढील १८ महिन्यांत किमान सहावेळा येणार आहेत.

प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा

हे पालकमंत्री दौऱ्यावर आल्यावर ते प्रत्येक मतदार संघासाठीच्या २२ जणांची कोअर कमिटी व सहा विधानसभेचे प्रत्येकी ११ असे ८८ प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, त्यामध्ये कोणता अधिकारी आडकाठी आणतो आहे का.. मतदार संघातील कोणते प्रश्न केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहेत, ते सोडवण्यासाठी काय करायला हवे असाही प्रयत्न केला जाणार आहे. पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक, डॉक्टर, वकील अशा विविध वर्गातील मान्यवरांशी संवाद साधून पंतप्रधान मोंदी यांच्या कामाबद्दल जनमाणसांत काय प्रतिक्रिया आहेत हे देखील जाणून घेतले जाणार आहे.

भाजपने फक्त दोनवेळाच दिली लढत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ स्थापनेपासून भाजपने कधीच लढविलेला नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष वोरा १९९१ ला लढले. काँग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब माने यांनी त्यांचा पराभव केला. त्याच मतदार संघातून १९९६ ला गणपतराव सरनोबत लढले परंतु त्यांच्या वाट्याला गुलाल आला नाही. पुढे १९९८ पासून हा मतदार संघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. या पक्षालाही प्रथमच दोन्ही मतदार संघांत यश मिळाले. म्हणजे जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेला भाजप कोल्हापुरात मात्र लोकसभेला आतापर्यंत कधीच जिंकलेला नाही, असा इतिहास आहे. तो या निवडणुकीत कूस बदलतो का हीच उत्कंठा राहील.

Web Title: MPs Sanjay Mandlik and Darhysheel Mane will be the likely candidates of BJP in the upcoming Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.