चाचणी होऊनही एमपीएससीच्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा, विद्यार्थी संतप्त
By संदीप आडनाईक | Published: June 26, 2023 04:10 PM2023-06-26T16:10:01+5:302023-06-26T16:10:27+5:30
पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना पात्र ठरविण्याची मागणी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गतवर्षी घेतलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची दोन वेळा पुन्हा दहा मिनिटांची कौशल्य चाचणी घेऊनही अद्याप अंतिम निकाल न केल्याने परीक्षार्थी संतप्त झाले आहेत. या निकालाच्या प्रतीक्षेसोबतच सर्वच विद्यार्थ्यांना पात्र ठरवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा संवर्गातील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदाच्या भरती प्रक्रियेत लिपिक टंकलेखक पदाच्या ११६४ आणि कर सहायक पदाच्या २८५ जागांसाठी २०११ मध्ये आयोगाने जाहिरात दिली होती. ३ एप्रिल २०२२ रोजी पूर्व परीक्षा घेतल्यानंतर परीक्षेतील पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली. ७ डिसेंबर रोजी या मुख्य परीक्षेचा निकालही जाहीर केला, मात्र टंकलेखन चाचणीचा खोडा घालून आयोगाने या उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. तरीही उमेदवारांनी या वर्षी ७ एप्रिल रोजी मुंबईत कौशल्य चाचणी दिली. मात्र, अनेक तांत्रिक चुकांमुळे ही चाचणी पुन्हा ३१ मे रोजी आयोगाला घ्यावी लागली. या चाचणीतही पूर्वीपेक्षा अधिक त्रुटी झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला.
आता ही चाचणी होऊनही २५ दिवस उलटले तरीही आयोगाने निकाल जाहीर केलेला नाही. यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. २०२१ च्या परीक्षेपासून प्रथमच ही कौशल्य चाचणी सुरू करून आयोग विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या जाहीर न झाल्याने उमेदवारांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. सिसॅटनुसार कौशल्य चाचणीचे मूल्यांकन ३३ टक्के मान्य करुन त्याआधारे तत्काळ निकाल जाहीर करावा, अन्यथा सर्वच उमेदवारांना पात्र करावे, अशी मागणी ते करत आहेत.
दुसरी चाचणीही वादात
लोकसेवा आयोगाने टंकलेखनाचा उतारा जाहिरातीत दिलेल्या निकषांपेक्षा मोठा दिला. टायपिंग प्रमाणपत्र जीसीसी, टीबीसीच्या अर्हतेपेक्षा दहा मिनिटांत २५० शब्दांचा अवाढव्य उतारा दिला. आयोगाने कीबोर्ड लेआउट, आयएसएम रेमिंग्टन मराठीचे सांगितले असतानाही रेमिंग्टन गेल हा हिंदी लेआउट दिल्याची उमेदवारांची तक्रार आहे. ऑटो स्क्रोल बंद केल्यामुळे उमेदवारांना उतारा स्वत: स्क्रोल करावा लागत होता. तसेच टायपिंग करताना शब्द हायलाईट करण्याची सोय नव्हती, त्यामुळेही संभ्रम निर्माण झाला. यासंदर्भात या दुसऱ्या चाचणीसंदर्भातही अनेक उमेदवारांनी हरकती आयोगाकडे नोंदविल्या आहेत.