‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:19+5:302021-03-13T04:43:19+5:30

आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, नवीन वेळापत्रक यशावकाश जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रक गुरुवारी ...

The MPSC exam must be held on Sunday | ‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

‘एमपीएससी’ची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे

Next

आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, नवीन वेळापत्रक यशावकाश जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रक गुरुवारी दुपारी जारी केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती मिळताच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, परीक्षार्थी संतप्त झाले. राजारामपुरी, सायबर चौक परिसरातील खासगी अभ्यासिका, क्लासेसमधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आदी जिल्ह्यांतील असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी दुपारी साडेचारच्यासुमारास सायबर चौकामध्ये आल्या आणि त्यांनी रास्ता रोको करत तेथेच ठिय्या मारला. काहीवेळातच दोनशेहून अधिक विद्यार्थी याठिकाणी जमले. त्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात घोषणा सुरू केल्या. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी झाली. या आंदोलनाची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस तेथे तातडीने दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना रस्त्यातून बाजूला येण्याची विनंती केली मात्र, विद्यार्थी तेथून बाजूला जात नव्हते. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी शांततेची भूमिका घेत रस्त्याच्या बाजूला येऊन निदर्शने सुरू केली. सुमारे दीड तास त्यांचे आंदोलन सुरू होते. परीक्षा घेण्याबाबतच्या तुमच्या भावना शासनाला कळविण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले. दरम्यान, अखिल भारतीय नौजवान सभा, ऑल इंडिया युथ फेडरेशन आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्यावतीने सायंकाळी सहाच्या सुमारास बिंदू चौकात ठिय्या आंदोलनासह निर्दशने करण्यात आली. ‘एमपीएससी हाय हाय’, ‘ एमपीएससीची परीक्षा रविवारी झालीच पाहिजे’, ‘नोकरी आमच्या हक्काची’, अशा विविध घोषणा देत त्यांनी बिंदू चौक दणाणून सोडला. परीक्षा रविवारी घेण्याचा निर्णय जोपर्यंत सरकार जाहीर करत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला. या आंदोलनात गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, रवींद्र जाधव, आरती रेडेकर, केदार तहसीलदार, आदी सहभागी झाले.

Web Title: The MPSC exam must be held on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.