MPSC Result: कोल्हापूरची पूजा अवघडे अनुसूचित जातीमध्ये राज्यात दुसरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 11:42 AM2022-06-01T11:42:36+5:302022-06-01T12:18:56+5:30
म्हाळुंगेचा विश्वजित गाताडे इतर मागासमध्ये राज्यात तिसरा, कौलगेची श्रद्धा चव्हाण सर्वसाधारण मुलींमध्ये राज्यात पाचवी
कोल्हापूर : राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील मजूर, पेंटर, आरोग्य सेवक, कामगारांच्या मुलांनी या परीक्षेत यशाचा झेंडा फडकवला आहे. या सर्वांचे त्यांच्या गावातून आणि परिसरातून अभिनंदन होत असून मिरवणुकाही काढण्यात आल्या.
या परीक्षेची सर्वसाधारण यादी २९ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती. एमपीएससीने राज्यसेवेच्या विविध १५ संवर्गांतील एकूण २०० पदांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये मुलाखती घेतल्या होत्या. त्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना या सर्वांच्या गावातून, परिसरातून व्यक्त होत होती. कोणी कारखान्यात कामगार, कोणी साखर कारखान्यात मजूर, काेणी पेंटर, कोणाच्या घरात शिक्षणाची पार्श्वभूमीही नाही. अशा घरातील मुलांनी मिळवलेल्या या यशामुळे मंगळवारी संध्याकाळी या सर्वांच्या घरी आनंदाचे भरते आल्याचे पाहावयास मिळत होते.
पूजा अवघडे : कोल्हापुरात राजारामपुरी चौथ्या गल्लीत राहणारी पूजा नायब तहसीलदार म्हणून निवडली गेली आहे. राजाराम विद्यालय, उषाराजे हायस्कूल आणि राजाराम कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले. शिवाजी विद्यापीठातून तिने एमएस्सी पूर्ण केले. यानंतर तिसऱ्या प्रयत्नामध्ये ती उत्तीर्ण झाली असून तिचे वडील पेंटर म्हणून काम करतात. शिक्षण झाल्यानंतर खासगी शिकवण्या घेत तिने अभ्यास केला आणि तिने या यशाला गवसणी घातली. ती अनुसूचित जाती महिलांमध्ये राज्यात दुसरी आली आहे.
विश्वजित गाताडे : इतर मागासांमध्ये राज्यात तिसरा आलेला विश्वजित जालंदर गाताडे हा करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावचा असून या परीक्षेतून त्याची सहा. राज्य कर आयुक्त वर्ग १ या पदासाठी निवड झाली आहे. विद्या मंदिर म्हाळुंगे, शाहू हायस्कूल म्हाळुंगे येथून शिक्षण झाल्यानंतर ११ वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण केले. बीएस्सी संख्याशस्त्र हा त्याचा विषय असून २०१९ पासून या परीक्षेची तयारी केली होती. विश्वजित याचे वडील हासूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत.
श्रद्धा चव्हाण : गडहिंग्लज तालुक्यातील कौलगेची रहिवासी असलेल्या श्रद्धाची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे. ही राज्यामध्ये मुलींमध्ये पाचवी आली आहे. गावातच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर तिने साधना ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिवराज महाविद्यालयातून रसायनशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर तिने शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण केले. गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये मजूर म्हणून काम करत असलेल्या शंकर चव्हाण याची ही कन्या होय.
ऐश्वर्या नाईक : करवीर तालुक्यातील हळदी गावची ऐश्वर्या सध्या एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. तिचे शिक्षण हळदी, पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू कॉलेज कोल्हापूर येथे झाले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात एमए अर्थशास्त्र पूर्ण केल्यानंतर ती २०२१ मध्ये सेट उत्तीर्ण झाली. या परीक्षेतून तिची उपाधीक्षक, भूमीलेख या पदासाठी निवड झाली आहे. वेंगुर्ला येथील खर्डेकर महाविद्यालयात कार्यरत क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक यांची ही कन्या होय.
अपर्णा यादव : करवीर तालुक्यातील निगवे येथील अपर्णा जयसिंग यादव हिचे प्राथमिक शिक्षण गावातच, तर माध्यमिक शिक्षण जोर्तिलिंग हायस्कूल वडणगे निगवे येथे झाले. विवेकानंद महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण, तर राजाराम कॉलेजमधून बीएस्सीचे शिक्षण झाले. कोणताही क्लास न लावता तिने हे यश संपादन केले असून तिचे वडील एमआयडीसीमध्ये कामगार म्हणून काम करतात. गेली तीन वर्षे ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दुसऱ्या प्रयत्नात तिची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली.
सुजय कदम : गडहिंग्लज येथील सुजय कदम याचे शिक्षण जागृती हायस्कूल, शिवराज महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून त्याची निवड झाली असून चार वेळा तो राज्य सेवेसाठी मुलाखतीपर्यंत गेला होता. अखेर या परीक्षेत त्याला यश मिळाले. शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी कदम यांचा तो चिरंजीव आहे.