‘एमपीएससी’चे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:23+5:302021-07-07T04:30:23+5:30

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) जाहीर झाल्या नसल्याने या परीक्षांची ...

‘MPSC’ students confused; Exam dates are horrible! | ‘एमपीएससी’चे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर!

‘एमपीएससी’चे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर!

Next

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) जाहीर झाल्या नसल्याने या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. वय वाढत असल्याने त्यांना या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार याचा घोर लागला आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या खासगी शिकवणी (प्रायव्हेट क्लासेस) ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. त्यात एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये वारंवार बदल करण्यात आले. पीएसआय, एसटीआय असिस्टंट, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आदी विविध पदांच्या भरतीसाठी अपेक्षित असणाऱ्या परीक्षांच्या तारखादेखील कोरोनाच्या स्थितीमुळे राज्य शासन आणि एमपीएससीकडून जाहीर झालेल्या नाहीत. ऑनलाईन क्लासेसमुळे नीट तयारीदेखील करता येत नाही. त्यातच एकीकडे या परीक्षांच्या जाहीर होत नसलेल्या तारखा आणि दुसरीकडे वय वाढत असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांमध्ये पुढे काय? करायचे यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ऑफलाईन क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी. परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

चौकट

या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?

पीएसआय, एसटीआय असिस्टंट, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, करसहाय्यक, लिपिक-टंकलेखक, सरळसेवा भरती अंतर्गत महिला व बालविकास विभागातील समाजकल्याण निरीक्षक, पोलीस भरती, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

चौकट

ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?

स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात एकत्रितपणे सुमारे शंभर क्लासेस आहेत. सुमारे ३० हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यात कोल्हापूरसह सोलापूर, बीड, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र, नेटवर्कसह अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेण्यातील मर्यादा या शिक्षणामध्ये आहेत. कोरोना नियम पालनाच्या अटींवर हे क्लासेस सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि क्लासेस चालकांकडून होत आहे.

विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!

पोलीस भरतीसह अन्य पदांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर होत नसल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलींसमोरील अडचणी वाढत आहेत. मुलींचे वय वाढत असल्याने त्यांच्या घरचे निर्णय बदलत आहेत. ऑनलाईन शिक्षणात एकाग्रता राहत नाही. त्यामुळे ऑफलाईन क्लासेस सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी. भरती आणि परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात.

-नंदिनी हवालदार, संभाजीनगर

अनेक विद्यार्थी वयाची मर्यादा ओलांडण्याच्या टप्प्यावर आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने तयारी करूनही भरती आणि परीक्षांच्या तारखा जाहीर होत नसल्याने आमची मानसिक स्थिती बिघडत आहे. त्याची दखल घेऊन राज्य शासन आणि एमपीएससीने समन्वय साधून लवकर भरती, परीक्षांच्या तारखा जाहीर करून आम्हाला दिलासा द्यावा.

-प्रकाश सादळे, रेंदाळ

क्लासचालकही अडचणीत !

स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यास मर्यादा आहेत. गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि क्लासेस चालकांची अडचण होत आहे. शासनाने कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या अटींवर क्लासेस ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास लवकर परवानगी द्यावी.

-प्रा. जॉर्ज क्रूझ

ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण असल्याने तेथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसचा उपयोग होत नाही. त्यांच्या शिक्षणात सातत्य राहत नाही. त्यांच्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन करता येत नाही. एकतर्फी शिक्षण होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑफलाईन क्लासेस सुरू करण्यास शासनाने मान्यता द्यावी.

-अभय पाटील

060721\06kol_1_06072021_5.jpg

डमी (०६०७२०२१-कोल-स्टार ८८६ डमी)

Web Title: ‘MPSC’ students confused; Exam dates are horrible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.