'एमपीएससी'च्या टंकलेखन चाचणीचा घोळ अजूनही कायम
By संदीप आडनाईक | Published: August 28, 2023 02:16 PM2023-08-28T14:16:36+5:302023-08-28T14:16:54+5:30
४०९ उमेदवारांचे गौडबंगाल
संदीप आडनाईक
कोल्हापूर : एमपीएससीने घेतलेल्या मंत्रालयीन लिपिक आणि कर सहायक पदाच्या २०२१साठी घेतलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणी निकालाचा घोळ अजूनही कायम आहे. आयोगाने १५० पदे रिक्त ठेवली आणि ३५० मुलांना अपात्र ठरविले. ‘लोकमत’ने याला वाच्यता फोडल्यानंतर पहिली अधिसूचना असतानाही पुन्हा दोन अधिसूचना काढल्या आणि परत पहिल्यानुसार निकाल जाहीर केला. अजूनही या निकालाचे कवित्व संपेना. दोषपूर्ण निकालानंतर रिस्पॉन्स शीटवरून आता उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्याचे स्पष्ट दिसत असल्याने उमेदवार आणि पालक संतप्त झाले आहेत. आयोगाने ही चाचणी दोषविरहित पद्धतीने पुन्हा घेऊन सुधारित निकाल लावावा, अशी मागणी होत आहे.
एमपीएससीने मंत्रालयीन लिपिक आणि कर सहायक या पदांसाठी २०२१ पासून पहिल्यांदाच टंकलेखन पात्रता स्वरूपाची कौशल्य चाचणी घेतली. ७ एप्रिलच्या पहिल्या चाचणीत तांत्रिक अडचणी आल्याने ३१ मे रोजी पुन्हा घेतली. त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने आणि पहिल्या अधिसूचनेनुसार परीक्षा न घेतल्याने उमेदवारांनी आक्षेप नोंदविला तरीही आयोगाने १२ जुलैला निकाल जाहीर केला. त्यात १५० जागा रिक्त ठेवल्या. यावरही अनेकांनी आक्षेप घेतल्याने ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केला.
त्यावर आयोगाने खुलासा देऊन निकालानंतर २० जुलैला निकष जाहीर केले आणि आता २६ जुलैला विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात त्यांनी टाइप केलेली रिस्पॉन्स शीट पाठविली आहे. या सूचीवरून अनेक विद्यार्थ्यांचा उतारा टाइप करताना चुकलेल्या शब्दांची संख्या आणि आयोगाने दिलेली चुकीच्या शब्दांची संख्या त्यात बरीच तफावत असल्याचे आढळत आहे.
अनेक पात्र विद्यार्थी अपात्र
काही विद्यार्थ्यांनी २५१ शब्द टाइप करून त्यातील ४ शब्द चुकीचे असताना एमपीएससीच्या सूचित १८९ शब्द चुकीचे आणि ६२ बरोबर असल्याने त्याला अपात्र ठरवले. ही पात्रता २१२ अचूक शब्द अशी ठरवली. असाच अन्याय अनेक विद्यार्थ्यांवर झाला आहे. त्यामुळे पात्र असणारे अनेक विद्यार्थी अपात्र झाले आहेत.
४०९ उमेदवारांचे गौडबंगाल
एकूण पात्र २,११५ उमेदवारांच्या यादीत पात्रतेसाठी आवश्यक २३६ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४०९ आहे. या सर्वांना पात्र ठरवले आहे. २३५ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ आणि २३७ शब्द टाइप केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त ९ आहे. हा योगायोग आहे की, या विसंगतीमागे उत्तरपत्रिका तपासणीत काही गौडबंगाल आहे, हे शोधावे लागणार आहे.
असे आहेत ‘शब्द’
२३०-२९, २३१-२२, २३२-१९, २३३-१६, २३४-२४, २३५-१९, २३६-४०९, २३७-९, २३८-५, २३९-९, २४०-५ असे एकूण ५६८ उमेदवारांच्या शब्दाची आकडेवारी तक्रारदार उमेदवारांनी जाहीर केली आहे.