महावितरण, ग्राहकांच्या संयमालाच करंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:17 AM2021-07-18T04:17:17+5:302021-07-18T04:17:17+5:30

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ...

MSEDCL | महावितरण, ग्राहकांच्या संयमालाच करंट

महावितरण, ग्राहकांच्या संयमालाच करंट

Next

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ग्राहकाकडून उचलले गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडल्याने काेणी कोणाला दोष द्यायचा असा पेच निर्माण झाला आहे. कोरोनामुळे ग्राहकराजा कंगाल झाला आहे, तर वसुली नसल्याने महावितरणही डबघाईला आले आहे. या दोघांच्या संयमालाच करंट बसला असून आता सरकारने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा नाही काढला तर दोघेही देशोधडीला लागणार एवढे मात्र निश्चित.

पावनेदोन वर्षांपासून कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार हिरावले. वीज वापरली आहे, म्हणजे बिल हे द्यावेच लागणार हे कळते. पण खायला पैसा उरला नाही तेथे वीज बिलासाठी पैसा आणायचा कुठून या विवंचनेत ग्राहक आहेत. पहिल्या लॉकडाऊन काळातील बिले माफ होतील या आशेवर ग्राहक राहिले. शासनाने हात वर केल्याचे लक्षात आल्यानंतर नव्या वर्षापासून ग्राहकांनी नव्या रोजगाराची वाट धरली, जरा जम बसतोय नाही तोवर एप्रिलपासून पुन्हा कोरोना वाढला आणि जो लॉकडाऊन झाला त्यातून अजूनही सुटका झालेली नाही. सर्वसामान्य ग्राहक घरखर्चाचा हिशेब सांभाळता सांभाळता मेटाकुटीला आला आहे. त्यात भरीस भर म्हणून पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलासह रोजच्या किराणा सामानातही महागाईने कहर केल्याने बचतीचे तीन तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत वीज बिलांची थकबाकी भरायची म्हटली तर किमान चार पाच हजारांवर आकडा गेला आहे. एका दमात ते भरणे शक्य नसल्याने हफ्ते पाडून मिळतील अशी ग्राहकाची अपेक्षा. पण ती पूर्ण होत नसल्याने ग्राहक हतबल आहेत.

ग्राहकांची ही परिस्थिती असताना, महावितरणचे सर्व काही आलबेल आहे, अशातील परिस्थिती नाही. ग्राहकांकडून वसुलीच थांबल्याने वीज खरेदी, वितरणासह कामगारांचा खर्च कशातून भागवायचा याची विवंचना आहे. लोकप्रतिनिधी, ग्राहकांकडून दबाव येत असला तरी कंपनी बंद पडण्यापासून वाचविण्यासाठी वसुली मोहीम तीव्र करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. रक्कम वसूल होत नाही तर थेट वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

चौकट

जिल्ह्याची ३३७ कोटी ४६ लाख थकबाकी

जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ६४४ ग्राहकांकडे ३३७ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४ लाख १ हजार ३०३ ग्राहकांकडे १८० कोटी ५१ लाख रुपये तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या ५००९ वीजजोडण्यांचे १५२ कोटी २६ लाख रुपये थकले आहेत.

चौकट

हप्ते पाडून देऊ पण कधी

वीज थकबाकीदारांची वीज तोडू नका, बिल भरण्यासाठी हप्ते पाडून द्या अशा सूचना कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना केल्या होत्या. पण त्यांची पाठ फिरल्यानंतर लगेचच वीज जोडण्या खंडित केल्या जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह उद्योजकांकडूनही संताप व्यक्त होत आहे. याबाबत शनिवारी आम आदमी पार्टीने महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर हप्ते पाडून देण्याचा पुनरुच्चार महावितरणकडून करण्यात आला.

Web Title: MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.