महावितरणने तोडली ३२ गावांची वीज
By admin | Published: October 4, 2015 12:35 AM2015-10-04T00:35:59+5:302015-10-04T00:35:59+5:30
थकबाकीसाठी कारवाई : पाणीपुरवठ्याची पावणेपाच कोटींची थकबाकी
राजाराम लोंढे / कोल्हापूर
ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांच्या पावणेपाच कोटींच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने ३२ गावांतील वीजजोडण्या तोडल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे. जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजना थकीत असून कोल्हापूर ग्रामीण भाग २ मधील गावांचा सर्वाधिक समावेश आहे.
पाणीपुरवठा विभाग हा ग्रामपंचायतींची डोकेदुखी ठरू लागला आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पाणीपुरवठ्याची बिले भरमसाट येऊ लागली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांपासून दीड लाखापर्यंत महिन्याला विजेचे बिल येत असल्याने ग्रामपंचायतींचा ताळेबंद कोलमडला आहे. आॅगस्ट २०१५ अखेर जिल्ह्णातील १०४४ पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ७१ लाख १८ हजारांची थकबाकी आहे. गडहिंग्लज विभागातील २३६ योजनांकडे ७२ लाख ६० हजार थकबाकीपैकी २१ योजनांनी १ लाख रुपये भरले आहेत. कोल्हापूर ग्रामीण १ विभागाकडील २९४ योजनांकडे १ कोटी १४ लाखांपैकी ४३ योजनांनी ४ लाख १७ हजार रुपये भरले आहेत. उर्वरित ग्रामीण २ कडील ३२९ योजनांकडे २ कोटी ७८ लाख, जयसिंगपूर विभागातील १०१ योजनांकडे ६७ लाख ६७ हजार, इचलकरंजीमधील ६७ योजनांकडे ८ लाख १० हजार, कोल्हापूर शहर विभागाकडील १७ योजनांकडे ९४ हजारांची थकबाकी आहे.
या थकबाकीपोटी ग्रामपंचायतींना नोटिसा काढूनही बिल भरले नसल्याने महावितरणने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जयसिंगपूर विभागातील एक, तर कोल्हापूर ग्रामीण भाग १ मधील ३१ अशा ३२ योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.