ग्राहकाच्या शोले स्टाइल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:28+5:302021-03-21T04:23:28+5:30

कोल्हापूर : तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाइलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली. शनिवारी दुपारी सावित्रीबाई ...

MSEDCL breaks a sweat with customer's show style agitation | ग्राहकाच्या शोले स्टाइल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम

ग्राहकाच्या शोले स्टाइल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम

googlenewsNext

कोल्हापूर : तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाइलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली. शनिवारी दुपारी सावित्रीबाई फुले हाॅस्पिटलनजीकच्या महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न अग्निशमनच्या जवानांनी हाणून पाडल्याने पुढचा अनर्थ टळला. तोडलेले कनेक्शन जोडल्याचे महावितरणने सांगितल्यानंतर ही व्यक्ती इमारतीवरून खाली उतरली आणि दीड तासाच्या शोले नाट्यावर पडदा पडला.

संभाजीनगरातील हा ग्राहक रिक्षा व्यावसायिक आहे. एप्रिलपासून एकही बिल न भरल्याने नियमाप्रमाणे महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तरीही भरणा न झाल्याने शनिवारी घरातील विजेचे कनेक्शन तोडले. यावरून संतापलेल्या या ग्राहकाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील महावितरणचे कार्यालय गाठले; पण शनिवार अर्धा दिवसच कामाचा असल्याने दुपारी सर्व अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. घरातील वीज तुटल्याने आधीच संतापलेल्या या ग्राहकाने थेट या इमारतीचा चौथा मजला गाठला आणि तेथून माझी नोकरी गेली आहे, मी बिल कसे भरू, थोडी मुदत द्या, असे ओरडून सांगू लागला. अचानक आरडाओरड सुरू झाल्याने लोकही जमले. यामुळे अधिकच चेव चढलेल्या या ग्राहकाने थेट इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा जोरजोरात देण्यास सुरुवात केली.

ही घटना कळल्यावर महावितरणचे अधिकारी धावत आले. लगेच अग्निशमक यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण तो ग्राहक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता, अखेर घरात वीज जोडल्याचे फोनवरून खात्री करून घेतल्यानंतरच तो इमारतीवरून खाली आला. वीज वापरली आहे, तर त्याचे बिल भरणे ही जबाबदारी असताना ते न करता यंत्रणेला वेठीस धरण्याच्या या प्रकारावर उपस्थितांपैकी अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

फोटो: २००३२०२१-कोल-महावितरण

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी शोले स्टाइलने आंदोलन करून महावितरणसह महापालिकेच्या अग्निशामक यंत्रणेस वेठीस धरणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांनी अशा प्रकारे ताब्यात घेण्यात आले.

Web Title: MSEDCL breaks a sweat with customer's show style agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.