ग्राहकाच्या शोले स्टाईल आंदोलनाने महावितरणला फुटला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 07:44 PM2021-03-20T19:44:55+5:302021-03-20T19:46:53+5:30
mahavitaran Kolhapur- तोडलेले वीज कनेक्शन पुर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाईलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली.
कोल्हापूर: तोडलेले वीज कनेक्शन पुर्ववत करण्यासाठी ग्राहकाने शोले स्टाईलने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली.
शनिवारी दुपारी सावित्रीबाई फुले हॉस्पीटलनजीकच्या महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्राच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न अग्नीशमनच्या जवानांनी हाणून पाडल्याने पुढचा अनर्थ टळला. तोडलेले कनेक्शन जोडल्याचे महावितरणने सांगितल्यानंतर हा इसम इमारतीवरुन खाली उतरला आणि दीड तासाच्या शोले नाट्यावर पडदा पडला.
संभाजीनगरातील हा ग्राहक रिक्षा व्यावसायिक आहे. एप्रिलपासून एकही बिल न भरल्याने नियमाप्रमाणे महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली होती. तरीही भरणा न झाल्याने शनिवारी घरातील वीजेचे कनेक्शन तोडण्यात आले.
यावरुन संतापलेल्या या ग्राहकाने सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथील महावितरणचे कार्यालय गाठले, पण शनिवार अर्धा दिवसच कामाचा असल्याने दुपारी सर्व अधिकारी, कर्मचारी घरी निघून गेले. घरातील वीज तुटल्याने आधीच संतापलेल्या या ग्राहकाने थेट या इमारतीचा चौथा मजला गाठला आणि तेथून माझी नोकरी गेली आहे, मी बिल कसे भरु , थोडी मुदत द्या असे ओरडून सांगू लागला. अचानक आरडाओरड सुरु झाल्याने लोकही जमले. यामुळे अधिकच चेव चढलेल्या या ग्राहकाने थेट इमारतीवरुन उडी मारण्याचा इशारा जोरजोरात देण्यास सुरुवात केली.
ही घटना कळल्यावर महावितरणचे अधिकारी धावत आले. लगेच अग्नीशमक यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले. अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, अखेर घरात वीज जोडल्याचे फोनवरुन खात्री करुन घेतल्यानंतरच तो इसम इमारतीवरुन खाली आला.
दीड तास सुरु असलेल्या नाट्यामुळे मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला तरी उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. दरम्यान वीज वापरली आहे, तर त्याचे बिल भरणे ही नैतिक जबाबदारी असताना ते न करता यंत्रणेला वेठीस धरण्याच्या या प्रकारावर उपस्थितांपैकी अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.