महावितरणचे कंत्राटी कामगार पाचशेची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:37+5:302021-01-22T04:23:37+5:30
कोल्हापूर : निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी दिलेला प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयात दोघा ...
कोल्हापूर : निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी दिलेला प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयात दोघा कंत्राटी कामगारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले. सुनील यशवंत हजारे (वय ३०, रा. हुन्नूर, कागल) व चंद्रकांत ऊर्फ बाळू साताप्पा मांढरेकर (३६, रा. केनवडे, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले की, तक्रारदाराचे वडील २०१० मध्ये महावितरणमधून निवृत्त झाले. त्यांचा निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी त्यांच्या वडिलांनी हजारे व मांढरेकर यांची २० नोव्हेंबर २०२० ला भेट घेऊन, प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवावा, अशी विनंती केली. वारंवार विनंती करूनही ते प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ करीत होते. बुधवारी (दि. १९) ला तक्रारदाराने हजारे यांची भेट घेतली असता, त्यांनी बाळू ऊर्फ चंद्रकांत यांच्याकडे मोबदला द्यावा लागेल, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने किती रुपये द्यावे लागतील, अशी विचारणा केली. त्यावर पाचशे रुपये द्या, अशी मागणी हजारे यांच्याकडून झाली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्यानंतर शासकीय पंचांसमक्ष लाच मागितल्याची खातरजमा केली. हजारे यांच्याशी तक्रारदाराने पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ती बाळू ऊर्फ चंद्रकांत मांढरेकर यांच्याकडे द्यावी असे सांगितले. हजारे यांनी तुमच्याकडे पाचशे रुपये देण्यास सांगितले आहेत, त्यानुसार मांढरेकर यांनी पाचशे रुपये स्वीकारले. यादरम्यान दहा मिनिटांनी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पाचशे रुपयांच्या नोटेसह संबंधित संशयित मांढरेकर यास ताब्यात घेतले. संशयित दोघेही महावितरणमध्ये कंत्राटी शिपाई आहेत.
या कारवाईत सहायक फौजदार शाम बुचडे, पोलीस कर्मचारी अजय चव्हाण, सुरज अपराध, कृष्णात पाटील, मयूर देसाई, संदीप पडवळ, रुपेश माने यांनी सहभाग घेतला.
फोटो : २१०१२०२१-कोल-सुनील हजारे (संशयित)
फोटो : २१०१२०२१-कोल-चंद्रकांत मांढरेकर (संशयित)