महावितरण ऐकेना...वीज कनेक्शन तोडण्याचा लावला सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:51+5:302021-03-14T04:21:51+5:30
कोपार्डे : थकीत वीजबिलासाठी महावितरणने कनेक्शन तोडण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. फुलेवाडी ग्रामीण उपविभागात येणाऱ्या करवीर तालुक्यातील अनेक ...
कोपार्डे : थकीत वीजबिलासाठी महावितरणने कनेक्शन तोडण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. फुलेवाडी ग्रामीण उपविभागात येणाऱ्या करवीर तालुक्यातील अनेक गावातील हजारो घरगुती वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात महावितरणने ग्राहकांना दर महिन्याला वीज बिल दिले नाहीत. त्यानंतर आलेले बिल सरासरी वीज वापराचा आधारावर ग्राहकांना देण्यात आली. याच दरम्यान वीजबिल दरवाढ झाली. त्यातच आलेली वीज बिले व विजेचा वापर यातही तफावत दिसत होती. याचा परिणाम घरगुती वीज बिले अवाच्या सवा आली. ऊर्जामंत्र्यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले माफ करण्याचे विधान केल्याने अनेकांनी ती भरली नाहीत. मात्र, वीजबिल भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडली जाणारच असे महावितरणकडून सांगण्यात आले असून त्यादृष्टीने महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहेत. जे ग्राहक वीजबिल भरण्यासाठी नकार देत आहेत त्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. फुलेवाडी ग्रामीण उपविभागात येणाऱ्या गावांमधील हजारो वीज कनेक्शन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडली आहेत.
कोट : यावर्षी कुडित्रे शाखेतील गावाची थकबाकी दीड कोटींवर पोहचली आहे. वीज बिल आकारणीत काय शंका असेल तर दूर करू. मार्चअखेर असल्याने वसुलीला सहकार्य करावे. प्रकाश चौगले (शाखा अभियंता कुडित्रे)
कोट : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वीज बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. कायद्याचा धाक दाखवूनही वसुली सुरू आहे, ती थांबवावी. -
संजय पाटील (वाकरे)