वीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:52 AM2021-03-02T11:52:57+5:302021-03-02T11:55:14+5:30

mahavitaran Kolhapur- लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.

MSEDCL employees in double cut from electricity bill recovery | वीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत

वीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत

googlenewsNext
ठळक मुद्देवीज बिल वसुलीवरून महावितरणचे कर्मचारी दुहेरी कात्रीत ग्राहकांकडून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांना मारहाण

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यावरून जनता आणि सरकार यांच्यामधील संघर्षाचा त्रास मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. वसुलीची मोहीम तीव्र केल्याच्या काही दिवसातच जिल्ह्यात १५ वायरमनना जनतेकडून मार खावा लागला आहे. एका बाजूला महावितरण अधिकाऱ्यांचा मार्चपर्यंत १०० टक्के वसुलीचा दबाब आणि दुसऱ्या बाजूला जनतेकडून मार, अशा दुहेरी कात्रीत हे कर्मचारी अडकले आहेत.

लॉकडाऊन काळातील वीज बिलांचा भरणा करण्यावरून सर्वसामान्य जनता व सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजाराहून अधिक कनेक्शन्स तोडली आहेत.

तोडलेले कनेक्शन जोडण्यासाठी ३०० रुपये सेवाशुल्कही आकारले जात असल्याने सर्वसामान्य जनतेच्या संतापात आणखीन भर पडली आहे. त्यातून कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या १५ वायरमनना आतापर्यंत मारहाण केली आहे.

हे कर्मचारी महावितरणचे नोकर आहेत. त्यांना महावितरणने मार्चअखेरपर्यंत १०० टक्के वसुलीचे टार्गेट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करावेच, असे सांगून त्याप्रमाणे त्यांना रोज प्रत्येक गावात धाडले जात आहे. पण तेथे जनतेकडून मार खावा लागत असल्याने, या कर्मचाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी झाली आहे. वाद सरकारशी आहे, त्याचा राग वायरमनवर का काढता, असा संतप्त सवाल ते करू लागले आहेत.

कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे धाव

कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनने सोमवारी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेच धाव घेतली आहे. संघटनेचे कृष्णा भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, मारहाणीकडे लक्ष वेधताना संरक्षणाची मागणी केली आहे. महावितरणची सरकारी कंपनी असल्याने तिला वाचविणेही महत्त्वाचे असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

संरक्षण द्याल, आमच्याशी गाठ

महावितरणच्या कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केल्यानंतर वीजग्राहकांचे नेतृत्व करणाऱ्या इरिगेशन फेडरेशन व वीज बिल भरणार नाही कृती समितीने वसुलीसाठी व कनेक्शन तोडण्यासाठी येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला संरक्षण पुरवू नये, पोलिसांनीही जनतेच्याच पाठीशी उभे राहावे, असे पत्र तयार करून पोलीस प्रशासनाकडे देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती विक्रांत पाटील किणीकर यांनी दिली.

Web Title: MSEDCL employees in double cut from electricity bill recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.