शहरातील ६१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची लढाई : आमदार जाधव यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:41+5:302021-07-27T04:25:41+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला वीजपुरवठा करण्यासाठी १६ सबस्टेशन आहेत, यापैकी दुधाळी, नागाळा पार्क, बापट कॅम्प व गांधीनगर ही चार ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला वीजपुरवठा करण्यासाठी १६ सबस्टेशन आहेत, यापैकी दुधाळी, नागाळा पार्क, बापट कॅम्प व गांधीनगर ही चार सबस्टेशन पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे सुमारे ७३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन त्यापैकी ६१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला असून, उर्वरित १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने येत्या चार दिवसांत सुरू होईल, असे कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले यांनी सोमवारी येथे सांगितले. आमदार चंद्रकांत जाधव यांनी या शहरातील सबस्टेशनला भेटी देऊन वीजस्थितीची पाहणी केली व ही उपकेंद्रे उंच जागेवर हलवण्यासाठी पर्यायी जागा सुचवाव्यात, त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
शहराचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा तसेच पुरामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, आवश्यक त्या सर्व उपाययोजना येत्या सहा महिन्यांत करून घ्या, अशा सूचना आमदार जाधव यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कोल्हापूर शहर पश्चिम उपविभागीय कार्यालय, दुधाळी येथे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले, उपकार्यकारी अभियंता विनायक पाटील, दुधाळी सबस्टेशनचे इनचार्ज संजय सानप, सहायक अभियंता इंद्रजीत कांबळे यांच्यासोबत शहरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याबाबत आमदार जाधव यांनी चर्चा केली.
पाण्यात जाणाऱ्या सबस्टेशनची उंची वाढवून घ्या. जे सबस्टेशन पाण्यात जात नाहीत, त्यांची क्षमता वाढवून घ्यावी. म्हणजे पाण्यात जाणाऱ्या चार सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या वीज ग्राहकांना उर्वरित बारा सबस्टेशनवरून वीजपुरवठा सुरू ठेवता येईल किंवा पुराच्या पाण्यात जाणाऱ्या सबस्टेशनसाठी पर्यायी जागा सुचवा, ती जागा मिळण्याकामी जिल्हाधिकारी, आयुक्त व गरज पडल्यास राज्य सरकारकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले. आमदार जाधव यांच्या सूचनेनुसार जी कामे करावी लागणार आहेत, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर सादर करू, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----
१२ हजार ग्राहकांचे मीटर जातात पाण्यात...
सुमारे बारा हजार ग्राहकांचे मीटर व ट्रान्स्फाॅर्मर पुराच्या पाण्यात जातात. या सर्व ट्रान्स्फॉर्मरची १३ किंवा १४ मीटरचे पोल वापरून, उंची वाढवून घ्यावी. विजेचे पोल पाण्यात जातात, त्यांची उंची वाढवून घ्यावी. जे मीटर पाण्यात जातात, जे मीटर बेसमेंटला आहेत, त्यांची जागा बदलण्याबाबत ग्राहकांना अधिसूचना जारी करावी अशी सूचना दिली.
फोटो : २६०७२०२१-कोल-एमएलए भेट
महापुरामुळे कोल्हापूर शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी महावितरणच्या विविध उपकेंद्रांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.