जरगनगरात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:04+5:302021-05-06T04:26:04+5:30
कोल्हापूर: जरगनगरात मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरण कर्मचारी रोहित तोडकर व उमेश आंबी यांनी जीवाची बाजी ...
कोल्हापूर: जरगनगरात मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरण कर्मचारी रोहित तोडकर व उमेश आंबी यांनी जीवाची बाजी लावून दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरळीत केला.
जरगनगर भागात वादळी वाऱ्यामुळे रात्री पावणे आठच्या सुमारास ११ के. व्ही. संभाजीनगर उच्चदाब वाहिनीवर निलगिरीचे झाड कोसळून पडल्याने त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याच भागात श्री हॉस्पिटल येथे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे महावितरणचे कर्मचारी रोहित तोडकर व उमेश आंबी यांच्या लक्षात आली. साधारणपणे ३५ ते ४० फूट उंची असणाऱ्या या निलगिरीच्या झाडाची २५ फूट लांबीची फांदी वाहिनीवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. निलगिरीचे झाड, गुळगुळीत असल्याने त्यावर चढणं कठीण होते. मात्र वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी हे काम लवकर पूर्ण करणे आवश्यक असल्याने इतर साधनांची वाट पाहण्यात वेळ दवडणे रोहित तोडकर यांना पटत नव्हते, ते लगेच कामाला लागले. रात्रीच्या वेळी जीवाची बाजी लावून वीज वाहिनीवर पडलेल्या निलगिरीच्या झाडांच्या फांद्या छाटून ते वीज वाहिनीपासून दूर केले. उमेश आंबी यांनी लघुदाब वीज वाहिनीच्या तुटलेल्या वीज तारा जोडून घेतल्या. अवघ्या दीड-दोन तासात त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी रोहित व उमेश यांनी पार पाडली. सदर कामी सहायक अभियंता अश्विनकुमार वागळे यांचे मार्गदर्शन लाभले.