इचलकरंजीत वादळी पावसाने महावितरणचे तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:30+5:302021-05-18T04:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर परिसरात रविवारी (दि. १६) चक्रीवादळासह आलेल्या पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये महावितरणचे सुमारे तीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर परिसरात रविवारी (दि. १६) चक्रीवादळासह आलेल्या पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये महावितरणचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या पूर्वतयारीमुळे यावर्षी नुकसान कमी झाल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्यासह विजेचे खांब पडले होते. त्यावेळी महावितरणला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून डिसेंबर ते जानेवारी या महिन्यामध्ये दर सोमवार व शुक्रवारी यादिवशी शहरातील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. या कामासाठी नगरपालिकेच्या इलेक्ट्रिकल विभागाने ही त्यांना मदत केली. या पूर्वतयारीमुळे रविवारी झालेल्या वादळी पावसात नुकसान कमी झाले. परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी नऊ विद्युत खांब पडले आहेत. शहरामध्ये नागरिकांकडून १५० ते २०० तक्रारी आल्या होत्या. वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात होणार, या अनुषंगाने कंपनीने पाच पथकांसह तयारी केली होती. या पथकामार्फत विविध ठिकाणी कामे करून तत्काळ शहरास विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला.
फोटो ओळी
१७०५२०२१-आयसीएच-०३
महावितरण कंपनीने नगरपालिकेच्या क्रेनच्या सहाय्याने झाडांच्या फांद्या तोडल्याने पावसामुळे कमी नुकसान झाले.