गडहिंग्लज विभागात महावितरणची २० दिवसात १.५० कोटीची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:10 PM2020-12-23T17:10:06+5:302020-12-23T17:11:49+5:30
mahavitaran News Kolhapur- कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीजबीले थकित आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या घर-टू-घर संपर्क मोहिमेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसात साडेतीन हजार ग्राहकांकडून तब्बल दीड कोटीची वसुली झाली.
राम मगदूम
गडहिंग्लज :कोरोनामुळे गडहिंग्लज विभागातील ग्राहकांकडून महावितरणची १५ कोटीची वीजबीले थकित आहेत. त्याच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या घर-टू-घर संपर्क मोहिमेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २० दिवसात साडेतीन हजार ग्राहकांकडून तब्बल दीड कोटीची वसुली झाली.
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक मिळून १ लाख ३५ हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी ४० हजार ७१४ ग्राहकांनी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२० अखेर एकही बील भरलेले नाही. त्यामुळे थकबाकी १५ कोटीवर गेली. त्याच्या वसुलीसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे.
पहिल्या टप्यात सरपंच ते आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेवून वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, गाववार मेळावे घेवून वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर आता घर-टू-घर मोहिम सुरू आहे. एकूण थकबाकीपैकी ३२ टक्के रक्कम भरणाऱ्यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी सोयीचे हप्ते पाडून दिले जात आहेत.
प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजचे उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, नेसरीचे संदीप दंडवते, आजºयाचे दयानंद कामतगी, चंदगडचे विशाल लोधी व त्यांचे सर्व सहकारी मोहिमेत सक्रीय सहभागी झाले आहेत.
तालुकानिहाय थकबाकी व वसुली कंसात लाखात
- गडहिंग्लज : ५.८८ कोटी (५८.३०)
- आजरा - २.७४ कोटी (४१.८५)
- चंदगड - ६.३८ कोटी (४७.४७)
एप्रिल ते नोव्हेंबरअखेर एकही बील न भरलेले ग्राहक तालुकानिहाय असे
- गडहिंग्लज - १६२८५
- आजरा - ६७३६
- चंदगड - १७६९३
दिवसात अडीच लाख जमा
शनिवारी (१९) सर्वाधिक ४३६१ ग्राहक आणि १ कोटी २६ लाख ६५ हजार थकबाकी असलेल्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी शाखेतंर्गत येणाऱ्या गावातील संपर्क मोहिमेत १५० ग्राहकांच्या भेटी घेण्यात आल्या. त्यापैकी ४० ग्राहकांनी अडीच लाख रूपये जमा केले तर ४० ग्राहकांनी सोयीचे हप्ते मागून घेतले.