रिटेल व होलसेल व्यापारी यांचा एम.एस.एम.ई. व्याख्येत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:25+5:302021-07-03T04:17:25+5:30
कोल्हापूर : रिटेल व किरकोळ व्यापारी यांचा एम.एस.एम.ई.च्या व्याख्येत समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र ...
कोल्हापूर : रिटेल व किरकोळ व्यापारी यांचा एम.एस.एम.ई.च्या व्याख्येत समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष व त्याचे राष्ट्रीय संघटन मंत्री ललित गांधी यांनी दिली.
२०१७ पर्यंत रिटेल होलसेल व्यापारी यांचा एम.एस.एम.ई.च्या व्याख्यांमध्ये समावेश होता, तो एका परिपत्रकाद्वारे रद्द करण्यात आला होता, एमएसएमई क्षेत्रासाठी केंद्र व राज्य सरकारांकडून वेळोवेळी विविध प्रोत्साहन योजना जाहीर केल्या जात असतात. या योजनांचा फायदा मिळण्यासाठी व्यापाऱ्यांचा समावेश एमएसएमइच्या व्याख्येत होणे आवश्यक होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच व्यापाऱ्यांची राष्ट्रीय शिखर संस्था कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन दिले होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभेत गडकरी यांनी महाराष्ट्र चेंबरची मागणी प्राधान्याने पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने देशातील व्यापारी क्षेत्राला सध्याच्या अडचणीच्या कालखंडात दिलासा मिळाला आहे. एमएसएमईच्या व्याख्येत समावेशामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्येसुद्धा व्यापाऱ्यांना फायदा होणार असून, बँकांच्या कर्जावरील व्याजदरातील सवलत सुद्धा व्यापारी वर्गाला उपलब्ध होणार आहे.
या व्याख्येतील बदलामुळे व्यापारी वर्गाला लॉकडाऊनमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या कालखंडात मदतीचा हात मिळेल, असा विश्वासही गांधी यांनी व्यक्त केला.