दहा कोटींच्या रस्त्याला मातीचा मुलामा
By admin | Published: February 6, 2015 12:23 AM2015-02-06T00:23:46+5:302015-02-06T00:45:57+5:30
कोल्हापूर-गगनबावडा रस्ता : रुंदीकरणाच्या कामात होतोय मातीचा वापर
प्रकाश पाटील- कोपार्डे -कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रश्न ऐरणीवर होता. लोकांना प्रवास करताना कसरत तर करावीच लागायची शिवाय वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. सध्या या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पिचिंगसाठी होणारा मातीचा वापर हा निधी पुन्हा मातीत मिसळणार काय? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कोल्हापूर-गगनबावडा रस्ता ५४ कि.मी.चा आहे. जास्त वर्दळ व पाऊस यामुळे या रस्त्याची दुरव्यस्था झाली आहे. खड्डेमय झालेल्या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च झाले असून, दर्जेदार कामाच्या अभावाने अवघ्या दीड ते दोन महिन्यांत पुन्हा खड्डे, अशी अवस्था गेल्या दहा वर्षांपासून पाहायला मिळत होती. या रस्त्यावर वाढलेली प्रवासी, मालवाहतूक, ऊसवाहतूक पाहता किमान दुपदरीकरण तरी व्हावे, अशी मागणी होत होती. यावर्षी शिंगणापूर फाटा ते भामटे (ता. करवीर) पर्यंतच्या रस्त्याचे दोन फुटाने रुंदीकरण व मजबुतीकरण यासाठी दहा कोटी मंजूर झाले आहेत. या रस्त्याचे काम पुणे येथील डी. जी. बेल्लेकर क न्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे.
सध्या रस्त्याच्या साईडपट्ट्या व रुंदीकरणासाठीच्या रस्त्यालगतचा सरफेस खोदून त्यामध्ये पावणा इंची खडीने पिचिंग सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामात ज्या सब कॉन्ट्रॅक्टरांकडे काम सुरू आहे, त्यांच्याकडून नियम धाब्यावर बसून पिचिंगसाठी कठीण सरफेस मिळवताना उत्खननातून काढलेली मातीच पुन्हा पावणा इंची खडीमध्ये वापरत पिचिंग केले जात आहे. यामध्ये ते पुन्हा दबून रस्ता खराब होत असल्याने दर्जा टिकविण्याचे मोठे काम शासकीय अधिकाऱ्यांवर आहे.
रस्त्याच्या कामासाठी वास्तविक तांत्रिक कौशल्य असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच देखरेख होणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांशवेळा मैलकुलीच या कामावर सुपरव्हिजन करताना पाहायला मिळत असल्याने कामाचा दर्जा कसा मिळणार, हा एक प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होत आहेत. साईडपट्ट्या व रुंदीकरणासाठी पावणा इंची खडीबरोबर मुरमाऐवजी मातीचा वापर होत असल्याने जनतेचा पैसा मातीत जाणार असून, याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
बजरंग पाटील
कोपार्डे (ता. करवीर)