पाण्याच्या टाकीत गुडघाभर गाळ : १५ वर्षांपासून स्वच्छता नसल्याने आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:02 AM2019-02-01T01:02:19+5:302019-02-01T01:02:36+5:30
ज्योती पाटील । पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ...
ज्योती पाटील ।
पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीची स्वच्छता १५ वर्षांपासून झाली नसल्याने टाकीची सुरक्षितता व लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा संबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांतून केली जात आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी आर. के. नगर सोसायटी नं. ६ येथील महादेवनगर मंदिरानजीक पाण्याची टाकी बांधून कोल्हापूर महापालिकेकडून आर. के. नगरसह जरगनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु या टाकीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केले असल्याने या टाकीत गुडघाभर गाळ साचून राहिला आहे. तसेच टाकीला टोपण नसल्याने टाकीत बाटल्या व अन्य साहित्य पाहावयास मिळते. टाकीच्या सभोवती भेगा पडल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, तसेच टाकीत साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेसाठी विनंती केली असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे टाकीचे बांधकाम ठिसूळ होऊन टाकी असुरक्षित बनली आहे.
या टाकीशेजारी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशावेळी टाकीचे ढपलेदेखील पडतात. त्यामुळे मुलांचे खेळणेदेखील धोकादायक बनले आहे तसेच टाकीच्या ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत तरीदेखील पर्यायी व्यवस्था नसल्याने याच टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता करावी व डागडुजी करावी, अशी मागणी आर. के. नगर परिसर व भागातील नागरिकांतून केली जात आहे.
अनेकवेळा महापालिकेक डे तक्रारी करूनदेखील अद्याप आर. के. नगरमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी टाकीला भेगा पडल्याने त्याची डागडुजी व स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
- संग्राम पोवाळकर, उपसरपंच पाचगाव.
आर. के. नगर परिसराला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते. ती टाकी अनेक वर्षे स्वच्छ न केल्याने दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करावी.
- प्रवीण कुंभार,
ग्रा. पं. सदस्य, पाचगाव.