५५ वाहनधारकांना मुकादमांनी घातला साडेआठ कोटी रुपयांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:24+5:302021-04-21T04:24:24+5:30
: साखर कारखाने व पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज प्रवीण कदम लोकमत न्यूज नेटवर्क इंगळी : इंगळी व परिसरातील चौदा ...
:
साखर कारखाने व पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज
प्रवीण कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
इंगळी : इंगळी व परिसरातील चौदा गावांमधील ५५ वाहनधारकांना गेल्या दोन वर्षात मुकादमांनी साडेआठ कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दयनीय अवस्था झालेल्या या वाहनधारकांना साखर कारखाने व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोलापूर, उस्मानाबाद, बीड, परभणी व कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी हजारो मजूर पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे येतात. सन २००० पूर्वी वाहनधारकांना साखर कारखान्यांकडून तोडणी मजूर पुरवले जायचे. मात्र, नंतरच्या काळात कारखान्यांनी टोळ्या करण्याचे बंद करून ती जबाबदारी वाहनधारकांवर सोपवली. वाहनधारकांना कारखान्यांमार्फत आगाऊ रक्कम देणे व त्यामधून वाहनधारकांनी मजुरांच्या टोळ्या करणे, असा प्रकार सुरू झाला.
ऊसतोडणी मजुरांच्याबाबतीतली आपली जबाबदारी वाहनधारकांवर देऊन कारखान्यांनी आपली जबाबदारी टाळली. तेव्हापासून सातत्याने कमी-अधिक प्रमाणात टोळ्यांकडून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षात मुकादमांच्या फसवणुकीच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक होऊनही याबाबत ना साखर कारखाने, ना सरकार गंभीर आहे.
व्यवसायामध्ये झालेल्या फसवणुकीमुळे कित्येकांनी आपली घरदारं विकली आहेत. कारखान्यांकडून टाळलेली जबाबदारी व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे वाहनधारक देशोधडीला लागले आहेत.
फसवणूकप्रकरणी हुपरी पोलिसांनी धाडसाने कारवाई करत मुकादमांवर गुन्हे दाखल केल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंगळी व परिसरातील १४ गावांमधील सुमारे ५५ वाहनधारकांची गेल्या दोन वर्षात मुकादमांनी आठ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे आणि गेल्या दहा वर्षाच्या काळातील आकडेवारी पाहिली तर विषयाची व्याप्ती धक्कादायक आहे. मात्र, जबाबदार घटकांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. आता या विषयाकडे पोलीस प्रशासन, साखर कारखाने व शासनाने परस्पर समन्वयातून फसवणूक झालेल्यांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट
कारखान्यांचा अजब न्यायच
ऊसतोडणी यंत्रणा साखर कारखान्यांसाठी आणि कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांना दिलेल्या अॅडव्हान्सचा बोजा वाहनधारकांच्या मालमत्तेवर नोंद हा कारखान्यांचा अजब न्यायच वाहनधारकांच्या अध:पतनास कारणीभूत आहे.
फोटो ओळी
२००४२०२१-आयसीएच-०१
गावनिहाय फसवणूक झालेली रक्कम.