मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज
By संदीप आडनाईक | Published: September 18, 2023 04:43 PM2023-09-18T16:43:26+5:302023-09-18T16:45:20+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘अभियान २०२५’ अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यामुळे १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ६१ आणि सांगली जिल्ह्यातील ९३ उपकेंद्र प्रतीक्षेत आहेत. सध्या सिंचनासाठी रात्री वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सौर कृषी वाहिनीमुळे त्यांना दिलासा मिळेल.
शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीज भार असणाऱ्या वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या ठिकाणी ५ ते १० किलोमीटर परिघातील गायरान, नापीक व पडीक जमिनीवर ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारण्यात येतील. -परेश भागवत, मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ, महावितरण.
सौर प्रकल्पासाठी शासकीय जमीन एक रुपये इतक्या नाममात्र दराने भाडेपट्टा तसेच पोटभाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल, त्यांना तीन वर्षांसाठी ५ लाख रुपये प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. -अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता, कोल्हापूर, महावितरण.
इथे होतील सौरऊर्जा प्रकल्प
कोल्हापूर जिल्हा
- ४३ उपकेंद्र
- ७९५ एकर जमीन
- १५९ मेगावॅट क्षमता
- ६५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज.
सांगली जिल्हा
- २८ उपकेंद्र
- ११५३ एकर जमीन
- १८६ मेगावॅट क्षमता
- ५९ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज
कोल्हापूर जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट उपकेंद्र आणि गावे
करवीर : कोगे (बहिरेश्वर), बालिंगा (आडूर),
गगनवाबडा : गगनबावडा (गगनबावडा), मार्गेवाडी-निवडे (म्हाळुंगे)
पन्हाळा : पडळ (माजगाव), बाजारभोगाव (पिसात्रे), सातवे (सावर्डे तर्फे सातवे), वेतवडे (हारपवडे), पाटपन्हाळा (पाटपन्हाळा), कळे (परखंदळे)
शाहूवाडी : शाहूवाडी (कोळगाव), सरुड (सरुड), वारुळ (वारुळ), मांजरे (मांजरे).
कागल : सिद्धनेर्ली (बामणी), सोनगे (बानगे व कुरुकली), केनवडे (केनवडे),
भुदरगड : पिंपळगाव (बामणे), कडगाव (तिरवडे), तांबाळे (अनफ बुद्रुक), शेलोली (शेलोली)
हातकणंगले : चोकाक (हेर्ले), हातकणंगले (आळते), कुंभोज (नेज), हुपरी (रेंदाळ), किणी वाठार (किणी व वाठारतर्फे वडगाव).
शिरोळ : कोथळी (कोथळी), अब्दुललाट (लाट), कोंडिग्रे (हरोली)
राधानगरी : सोळांकुर (नरतवडे),
चंदगड : चंदगड (काजिर्णे व चुर्णीचा वाडा), कोवाड (कोवाड), हलकर्णी (डुक्करवाडी), हलकर्णी एमआयडीसी (जंगमहट्टी), पार्ले (पार्ले), माणगाव (माणगाव), अडकूर (आमरोली व उत्साळी)
गडहिंग्लज : नेसरी (सांबरे व तावरेडी), महागाव (हरळी बुद्रुक), गडहिंग्लज एमआयडीसी (शेंद्री), हेब्बाळ-कसबा नुल (हनिमनाळ व हासुरचंपू)
आजरा : उत्तुर (मुमेवाडी व उत्तुर), गवसे (हारपवडे)
सांगली जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट उपकेंद्र आणि गावे
खानापूर-विटा : खानापूर (बेनापूर व रेणावी), लेंगरे (रेणावी), गार्डी (भाग्यनगर-भाकुचीवाडी), पारे (रेणावी), रेणावी (रेणावी)
जत : संख (आसंगी), शेगाव (कोसारी), उमदी (हळ्ळी), तिकोंडी (कोंत्याव बोबलाद व तिकोंडी), पाचापूर (शेड्याळ), धावडवाडी (बेवनूर व बिरनाळ), जिरग्याळ (जिरग्याळ), बसर्गी (बसर्गी), उटगी (बेलोंडगी), तासगाव : सावळज (खुजगाव), मणेराजुरी (गवाण), वायफळे (मोरळेपेड), कौलगे (खुजगाव), मांजर्डे (गौरगाव).
आटपाडी : खरसुंडी (घाणंद), लिंगीवरे (पळसखेड व लिंगीवरे), पुजारवाडी (पळसखेड),
कवठेमहांकाळ : बोरगाव (मळणगाव), ढालगाव (चुडेखिंडी), करोली (कोगनोळी), केरेवाडी (केरेवाडी), कडेगाव : वांगी (तडसर), शिरसगाव (शिरसगाव)