सिद्धार्थनगरात बहुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:05+5:302020-12-29T04:23:05+5:30

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदीलगतच सिद्धार्थनगर (प्रभाग क्रमांक २८) हा प्रभाग आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ...

Multi-colored fighting in Siddharthnagar | सिद्धार्थनगरात बहुरंगी लढत

सिद्धार्थनगरात बहुरंगी लढत

Next

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदीलगतच सिद्धार्थनगर (प्रभाग क्रमांक २८) हा प्रभाग आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून, येथे डझनभर इच्छुक झाले आहेत. प्रत्येकाने प्रतिस्पर्धी उमेदवारासोबत लढण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी सोशल मीडियावरून प्रचाराचा नारळ फोडला आहे. सध्या या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड आहे. शिवसेनेसह ताराराणी आघाडीही तगडा उमेदवार देणार आहे.

सिद्धार्थनगर प्रभागामध्ये २०१४च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे आणि काँग्रेसचे जय पटकारे यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये पिरजादे यांनी बाजी मारली होती. मात्र, स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले. परिणामी २५ जून २०१९ रोजी पोटनिवडणूक लागली. स्थायी समिती सभापतीपदाचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने या प्रभागात उमेदवार न देता काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जय पटकारे आणि ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनुले यांच्यात चुरस झाली. यामध्ये पटकारे यांनी ३७१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. दरम्यान, साडेतीन वर्षात प्रभागात ४ कोटींचा निधी खेचून विकासकामे केली.

आगामी निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रभागात चर्चा होती. मात्र, प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले. त्यामुळे इच्छुकांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरावे लागत आहे. गेल्या दोन निवडणुकींचा विचार केला तर या प्रभागात दोन्ही काँग्रेसची पकड आहे. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांचा गट येथे सक्रिय आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानालगतचा हा प्रभाग असून, त्यांना मानणाराही येथे गट आहे. त्यांच्यासाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची असून, तगडा उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

विद्यमान नगरसेवक जय पटकारे यांच्या पत्नी श्रेया पटकारे, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांच्या पत्नी अमृता सावंत, गतनिवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले नेपोलियन सोनुले यांच्या पत्नी श्वेता सोनुले, केएमटी कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक यांच्या पत्नी मीरा सरनाईक, माजी नगरसेविका सविता गजानन जरग यांच्यासह श्रुती इंद्रजित अडगुळे, तेजस्वनी घोरपडे, खुशबू प्रतिमराज पंडित, उमाश्री सुरक्षा सोहनी, स्वाती काळे, ऋतुजा कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे.

प्रभागातील समस्या

रखडलेले पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरण

अमृत योजनेतील पाईपलाईनचे काम काही ठिकाणी अपूर्ण

अमृ्त योजनेतून काम झाल्यानंतर रस्ते झालेले नाहीत.

काही भागात पाण्याची समस्या कायम

काही ठिकाणी रस्ते नव्याने झालेले नाहीत.

महापालिकेच्या शाळेची दुरवस्था

शिर्के उद्यानमध्ये खेळणी बसवली असली तरी परिसराची दुरवस्था

प्रतिक्रिया

दीड वर्षापैकी महापूर, कोरोनामध्ये बराच कालावधी गेला. महापुराच्यावेळी अनेकांची राहण्याची सोय केली. काेरोना बाधितांना बेड उपलब्ध करुन दिले. कमी वेळेत ७० लाखांचा निधी खेचून आणला. सरकारी शौचालयांची १५ वर्षांपासून दुरवस्था होती, त्यांची दुरुस्ती केली. शाहू समाज मंदिराच्या नूतनीकरणासाठी २५ लाखांचा निधी मंजूर आहे. पुढील पाच वर्षात तीन मजली इमारत उभारण्याचा आणि पाण्याचा प्रश्न १०० टक्के मार्गी लावण्याचा संकल्प आहे.

जय पटकारे, माजी नगरसेवक

चौकट

नोव्हेंबर २०१४ निवडणुकीतील चित्र

अफजल पिरजादे राष्ट्रवादी १,६८४

जय पटकारे काँग्रेस ८४८

लईक पिरजादे ताराराणी आघाडी ४१०

तेजस्वनी घोरपडे शिवसेना १३५

चौकट

पोटनिवडणुकीतील चित्र

जय पटकारे काँग्रेस १,५८०

नेपोलियन सोनुले ताराराणी आघाडी १,२०९

सुशील भांदिगरे अपक्ष ८४०

चौकट

प्रभागातील प्रमुख परिसर

ब्रम्हपुरी टेकडी परिसर, जुना बुधवार तालीम परिसर, नरसोबा मंदिर परिसर, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, भगतसिंग तरुण मंडळ

चौकट

सिद्धार्थनगरमध्ये गठ्ठा मतदान

प्रभागामध्ये सर्वाधिक मतदार सिद्धार्थनगर परिसरात आहेत. पोटनिवडणुकीमध्ये येथून दोन उमेदवार रिंगणात होते. यामधील एका उमेदवाराने माघार घेतली. दुसरे उमेदवार जय पटकारे यांच्या हे पथ्यावर पडले. आगामी निवडणुकीसाठी पाच ते सहा उमेदवार इच्छुक आहेत.

प्रभागात झालेली विकासकामे

प्रभागात बहुतांश ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण

पूर्ण प्रभागात एलईडी

स्वच्छतागृहांची दुरुस्ती

पंचगंगा घाट स्वच्छता

शिवाजी पूल ते पंचगंगा नदी घाट रस्ता

पंचगंगा स्मशानभूमीची डागडुजी

फोटो : केएमसी सिद्धार्थनगर प्रभाग १

ओळी : कोल्हापुरातील सिद्धार्थनगर प्रभागात रस्ते झाले असले तरी ड्रेनेजच्या झाकणांची दुरवस्था झाली असून, वाहतुकीला धोका बनली आहेत.

फोटो : केएमसी सिद्धार्थनगर प्रभाग २

ओळी : ब्रम्हेश्वर टेकडी परिसरात ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर रस्ता करण्यात आलेला नाही.

Web Title: Multi-colored fighting in Siddharthnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.