मुलखावेगळा - हेच आम्ही अनुभवलं होतं -- दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:00 AM2018-04-03T00:00:25+5:302018-04-03T00:00:25+5:30
भारत चव्हाण
गेल्या आठवड्यात आमच्या घरातील एक सदस्य आम्हाला कायमचा सोडून गेला. तो आमच्या कुळातील नव्हता. नात्यातील नव्हता. आमच्या घरातही जन्मलेला नव्हता. त्याची जमात वेगळी, आमची जमात वेगळी तरीही तो आमच्या घरातील इतर सदस्यांप्रमाणे राहण्याचा, वागण्याचा, खाण्याचा एवढेच नाही तर घरातील प्रत्येक गोष्टींवर त्याचा हक्क होता. आम्ही सकाळी उठण्यापूर्वीच तो उठायचा. घरातील कोणाला उठायला वेळ झाला तर घड्याळाच्या गजराप्रमाणे तो अन्य सदस्यांना उठवायचा. आम्ही चहा घ्यायचो, त्यावेळी त्यालाही दूध, बे्रड किंवा बिस्किट अगदी हक्कानेच लागायची. दुपारी जेवायला बसलो की तोही जेवणासाठी सज्ज! भाकरी असो की चपाती खाण्यात कधी नखरेपणा केला नाही. आम्ही जे खायचे तेच तो खायचा. बरं एवढं सगळं उघड्यावर असून त्याने स्वत: कधी हट्टीपणा नाही. जेथे आम्ही बसायचो, झोपायचो त्याच ठिकाणी त्याचीही जागा असायची. आम्ही खुर्चीवर बसलो की तो खुर्चीवर बसायचा. खाली जमिनीवर बसलो की तोही आमच्याप्रमाणेच जमिनीवर बसायचा. आम्ही त्याच्याशी बोलायचो, पण तो बोलू शकत नव्हता; परंतु त्याच्या भावना त्याचे हावभाव, हालचालींवरून स्पष्ट कळायच्या. कधी जाणीवपूर्वक कोणाची कळ काढली नाही की कोणावर ओरडलाही नाही. उलट दांडगा खाबरट! एक दिवस, एक क्षण त्याच्या सहवासाशिवाय गेला नाही; पण आम्ही त्याला आता कायमचा गमावलोय. त्याची जाणीव सतत होत राहील, इतकं घनिष्ट नातं आमचं जमलं होतं. खरंतर तो आमच्या घरात आला कसा हाही एक थरारक प्रसंग आहे. एकेदिवशी प्रचंड पाऊस पडत होता. ओढे-नोल्यांतून भरपूर पाणी वाहत होते. अशा पाण्यातून मोठ्या उंदराएवढा एक जीव त्या ओढ्यातून वाहत आला. तो जीव माझ्या पुतण्याच्या दृष्टीस पडला. काय करायचं त्याला सुचेना. थांबून बघितलं तर त्याच्या पोटाची हालचाल जाणवली. हालचाल सुरू आहे म्हटल्यावर त्याला हातात घेतले. ओले अंग हातरुमालाने पुसले. त्यातच त्याला गुंडाळले आणि घरी आणले. घरात त्याला अधिक उबदार कपड्यात गुंडाळून ठेवला. बाळाची दुधाची बाटली तयार झाली. दूध पाजणं, गुंडाळेलं कापड बदलणं आणि त्याची हालचाल पाहणं आमचा दीनक्रम बनला. तब्बल पंधरा दिवसांनी त्यानं स्वत:च्या डोळ्यांनी जग पाहीलं. तेव्हापासून त्याने आमचे चेहरे अखेरपर्यंत आपल्या डोळ्यांत साठविले. जसं जसं दिवस पुढे सरकतील तसे त्याने सर्वांनाच जीव लावला. आमची भाषा त्याला कळायला लागली. त्याचे भाव आम्हाला कळायला लागले. त्यामुळे संवादही व्हायला लागला. बारा वर्षे तो आमच्या घरात राहिला. खुर्चीवर बसला, गादीवर झोपला; पण एक दिवससुद्धा त्याने घरात घाण केली नाही. जेवणाच्या भांड्यांसमोर बसला पण कधी त्याला तोंड लावलं नाही. परकं कोणी घरात आलं, बळजबरीने कोणाची कळ काढली नाही. एक इमानदार साथीदार म्हणूनच तो जगला. वृद्ध आई एखाद्या दिवशी उशिरापर्यंत झोपली की तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडून तो तिला जागे करायचा. इतकं वेळ का झोपलीस, असंही तो हक्काने विचारायचा. एखाद्या अवेळी भूक लागली तरी तो हक्काने मागायचा. त्याच्या वृद्धापकाळात त्याला डोळ्यांनी दिसायचं कमी झालं. काही महिन्यांनी त्याला दिसणंच बंद झालं; पण घरचा कोपरा अन् कोपरा ठाऊक असलेल्या या आमच्या इमानदारांनं आगतिक न होता अंदाजे चालणं, फिरणं सुरूच ठेवलं. डोळ्यांनी दिसणं बंद झालं. चालण्यातील ताकदही कमी झाली. मग त्याला घास भरवायला लागलं; पण घरात घाण केली नाही. शेवटी-शेवटी त्याला होणाऱ्या वेदना बोलून दाखवायला येत नव्हत्या; पण त्याच्या चेहºयावरील भाव बरेच काही सांगायचे. तोही अस्वस्थ व्हायचा आणि आमचं सगळं कुटुंबही! जायच्या आधी तर चार-पाच दिवस सगळ्यांनाच बेचैन व्हायला लागलं. जीवनाचा अंत जवळ आलाय याची त्याला आणि आम्हालाही जाणीव झाली. काहीच न खाल्यामुळे दुपारच्या वेळी बळजबरीने त्याला एक वाटीभर दूध घातलं. दूध कसं तरी घोटलं आणि न दिसणाºया डोळ्यांनी एकदा घर, घरातील चेहरे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. अन् डोळे मिटून घेतले. कधीही न उघडण्यासाठी! एक मुका जीव किती लळा लाऊ शकतो, हेच आम्ही अनुभवलं होतं.