Kolhapur: कळंबा कारागृहात कैद्याचा खून: मनोजचा मोहंमद बनून बॉम्बस्फोटात सहभाग, खुनामागे अनेक कारणांची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:59 AM2024-06-03T11:59:16+5:302024-06-03T12:00:43+5:30

तपास यंत्रणांचे कळंबा कारागृहात ठाण

Mumbai-based Manoj Kumar Bhawarlal Gupta, who was murdered in Kalamba Jail, converted to Munna alias Mohammad Ali Khan | Kolhapur: कळंबा कारागृहात कैद्याचा खून: मनोजचा मोहंमद बनून बॉम्बस्फोटात सहभाग, खुनामागे अनेक कारणांची शक्यता

Kolhapur: कळंबा कारागृहात कैद्याचा खून: मनोजचा मोहंमद बनून बॉम्बस्फोटात सहभाग, खुनामागे अनेक कारणांची शक्यता

कोल्हापूर : मुंबईतील मनोजकुमार भवरलाल गुुप्ता हा धर्मांतर करून मुन्ना ऊर्फ मोहंमद अली खान बनला. त्यानंतर तो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला आणि मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक बनला.

अटकेपासूनच त्याने प्रत्येक कारागृहात इतर कैद्यांवर दहशत निर्माण केली होती. मात्र, कळंबा कारागृहात त्याच्या खुनानेच त्याची दहशत संपली. त्याच्या खुनामुळे बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातील अन्य कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

बलदंड शरीर, वाढलेली पांढरी दाढी, धारदार नजर आणि तापट स्वभावाचा मुन्ना खान मुंबई बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अटक झाल्यापासून मुंबईतील आर्थर जेलमध्ये शिक्षा भोगत होता. २८ सप्टेंबर २०१३ पासून त्याला कळंबा कारागृहात पाठवले. मुंबईतही त्याने अनेक कैद्यांशी वाद घातला होता. कळंबा कारागृहात आल्यापासून तो काही कैद्यांना सोबत घेऊन नव्याने कारागृहात आलेल्या कैद्यांना दमदाटी करीत होता.

रागीट स्वभावामुळे अन्य कैदी त्याच्यापासून फटकून वागत होते. यातूनच कारागृहात त्याचे अनेक शत्रू तयार झाले होते. याच शत्रुत्वातून त्याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज उपमहासंचालक स्वाती साठे यांनी वर्तवला.

नातेवाइकांशी संपर्क

खुनाच्या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने मुन्ना खान याच्या पत्नीशी संपर्क साधला असून, ती केरळमध्ये असल्याचे समजले. त्याचा एक भाऊ उत्तर प्रदेशात असून, तो कोल्हापुरात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात द्यायचा, की त्याच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करायचे, याचा निर्णय होईल.

दीड वर्षात तिसरा खून

कळंबा कारागृहात गेल्या दीड वर्षात कैद्यांच्या हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला. बाललैंगिक प्रतिबंधक गुन्ह्यात शिक्षा भोगणारा सतपालसिंग कोठाडा याच्यासह आणखी एका कैद्याचा खून गेल्या वर्षी झाला होता.

बॉम्बस्फोटातील आणखी चार कैदी कळंब्यात

मुंबई बॉम्बस्फोटातील एकूण पाच कैदी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होते. यातील एका कैद्याचा खून झाल्यामुळे इतर चार कैद्यांना सुरक्षित वॉर्डमध्ये हलवण्यात आले. या सर्व कैद्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा असल्याने त्यांना कोणत्याही सवलतीचा लाभ मिळत नाही.

हल्लेखोर मोक्का आणि खुनातील

बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण (रा. समर्थ कॉलनी, जत, जि. सांगली ), प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील (रा. अजिंक्यनगर, इस्लामपूर, जि. सांगली) आणि ऋतुराज ऊर्फ डेज्या विनायक इनामदार (रा. जोशी गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर) हे तिघे मोक्काच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. सौरभ सिद आणि दीपक खोत हे दोघे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. चव्हाण हा मार्च २०२३ पासून, पाटील हा ऑगस्ट २०२० पासून, इनामदार हा मार्च २०२० पासून, सिद आणि खोत हे दोघे जून २०२२ पासून शिक्षा भोगत आहेत.

कारागृहातील १५८ पदे रिक्त

कळंबा कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या १५८ जागा रिक्त आहेत, तर अधिकाऱ्यांच्या १७ जागा रिक्त आहेत. कारागृहाची कैदी क्षमता १६९९ असून, प्रत्यक्षात २१८० कैदी शिक्षा भोगत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Mumbai-based Manoj Kumar Bhawarlal Gupta, who was murdered in Kalamba Jail, converted to Munna alias Mohammad Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.