Kolhapur: कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून; पाच बंदी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:59 PM2024-06-08T16:59:06+5:302024-06-08T16:59:21+5:30
कोल्हापूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी पाच न्यायालयीन बंदीना ताब्यात घेतले. कारागृहातील ...
कोल्हापूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी पाच न्यायालयीन बंदीना ताब्यात घेतले. कारागृहातील न्यायालयीन बंदी प्रतीक ऊर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांना आज, शनिवारी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
या पाच जणांना ताब्यात घेण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांनी संबंधित न्यायालयाकडे पत्रव्यवहार केला होता. खून प्रकरणात पाच जण संशयित असल्याने त्याचा ताबा मिळावा, अशी मागणी पत्रव्यवहारात केली होती. शुक्रवारी ही मागणी मान्य झाल्याने संशयितांना ताब्यात घेतल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.
सन १९९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान ऊर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७०) याचा कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाच कैद्यांनी ड्रेनेजचे झाकण डोक्यात घालून निर्घृण खून केला. ही घटना २ जूनला सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील आंघोळीच्या हौदावर घडली होती.