मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

By उद्धव गोडसे | Published: June 2, 2024 01:41 PM2024-06-02T13:41:20+5:302024-06-02T13:41:41+5:30

कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

Mumbai bomb blast accused killed in Kalamba Jail | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

कोल्हापूर : १९९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७०) याचा कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाच कैद्यांनी ड्रेनेजचे लोखंडी झाकण डोक्यात घालून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील आंघोळीच्या हौदावर घडली. याप्रकरणी कारागृहातील न्यायालयीन बंदी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध या पाच जणांची चौकशी जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी तो आंघोळीसाठी कारागृहातील हौदावर गेला. त्याठिकाणी आधीच थांबलेल्या कैद्यांसोबत त्याचा वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. त्यावेळी न्यायालयीन बंदी प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध यांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकण काढून खान याच्या डोक्यात घातले. वर्मी घाव लागल्याने खान जागेवरच कोसळला.

कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन पंचनामा केला. गेल्या दीड ते दोन महिन्यात शंभराहून अधिक मोबाइल सापडल्याने कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिका-यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून ११ कर्मचा-यांसह दोन अधिका-यांना बडतर्फ केले, तर दोन अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्यानंतरही कळंबा कारागृहातील गैरप्रकार थांबलेले नाहीत.

Web Title: Mumbai bomb blast accused killed in Kalamba Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.