मुंबई क्राईम ब्रँचचे पथक रिकाम्या हाताने परतले
By admin | Published: March 1, 2015 12:34 AM2015-03-01T00:34:42+5:302015-03-01T00:36:35+5:30
पानसरे हत्या प्रकरण : तपासाबाबत गोपनीयता
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापुरात तळ ठोकून बसलेले मुंबई क्राईम ब्रँचचे पथक अखेर धागेदोरे न मिळाल्याने रिकाम्या हाताने मुंबईला परतले. आतापर्यंत हाती लागलेल्या माहितीची कोल्हापूर पोलीस अतिशय बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या खात्री करीत आहेत. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी सुरुवातीपासून तपासाबाबत गोपनीयता पाळली आहे.
दरम्यान, फॉरेन्सिक लॅबने केलेल्या तपासणीत पानसरे व त्यांच्या पत्नीवर मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे उघड झाले आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना प्राप्त झाला नसल्याचे तपास अधिकारी अंकित गोयल यांनी सांगितले.
पानसरे यांच्यावरील हत्येच्या तपासासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचजणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून माहिती घेतली. रुग्णालयामध्येही जाऊन त्यांनी पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्यांनी तपासाला सुरुवात केली. सलग आठ दिवस हे पथक कोल्हापुरात तळ ठोकून होते. या कालावधीत कोणतेच धागेदोरे हाती न लागल्याने ते माघारी मुंबईला परतले.
पानसरे यांच्या नातेवाइकांसह त्यांच्या घराशेजारील लोक, सामाजिक, राजकीय संस्थांचे कार्यकर्ते अशा सुमारे २५० पेक्षा जास्त लोकांचे जबाब आतापर्यंत नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. पुणे फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष येऊन पंचनामा केला होता. त्या अहवालात मारेकऱ्यांनी दोन पिस्तुलांतून पाच गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अहवाल अद्याप कोल्हापूर पोलिसांना मिळालेला नाही.