Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:28 AM2024-03-01T11:28:25+5:302024-03-01T11:32:20+5:30
हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्रयाग चिखली : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील कृष्णात महादेव पाटील (वय ४७) यांच्या मृतदेहाऐवजी मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने सतीश रुईया या व्यक्तीचा मृतदेह मुंबईहून वरणगे पाडळी येथे पाठवला. मृतदेहाला अग्नी देण्यापूर्वी मुखात पाणी सोडताना हा गंभीर प्रकार उघडकीस आला. हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वरणगेतील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिपाई असलेल्या कृष्णात महादेव पाटील यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी नातेवाइकांनी त्यांना मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी बुधवारी (दि. २८) हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने कपड्यात गुंडाळून ठेवलेला मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. बिल आणि कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह गावाकडे पाठवण्यात आला.
मृतदेह गावात पोहोचताच अंत्यविधीची तयारी करण्यात आली. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर मृतदेह सरणावर ठेवण्यात आला. मृताच्या तोंडात पाणी सोडण्यासाठी तोंडावरील कापड काढण्यात आले तेव्हा नातेवाईक आणि नागरिकांना धक्काच बसला; कारण तो मृतदेह कृष्णात पाटील यांच्याऐवजी मुंबईतील सतीश रुईया नावाच्या व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांची तारांबळ उडाली.
हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संपर्क साधून गावकऱ्यांनी तो मृतदेह मुंबईला पाठवला आणि कृष्णात पाटील यांच्या मृतदेहाची शहानिशा करून तो आणण्यासाठी ते मुंबईला रवाना झाले. मनमिळावू आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती असणाऱ्या कृष्णात पाटील यांच्या आकस्मिक निधनाने लोक अगोदरच हळहळले होते. त्यातच हिंदुजा हॉस्पिटलच्या प्रशासनाने केलेल्या गलथान कृत्याबद्दल लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
मुलांच्या शिक्षणासाठी धडपड
कृष्णात पाटील हे मुलांच्या शिक्षणासाठी सतत धडपड करीत होते. एका मुलाला डॉक्टर, तर दुसऱ्या मुलाला प्रशासकीय अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. अनेक गरजूंना वैद्यकीय मदत देण्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असे.