मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:03 AM2019-08-28T01:03:27+5:302019-08-28T01:03:31+5:30

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवार (दि. १ सप्टेंबर) पासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, ...

Mumbai-Kolhapur airline starting Sunday | मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवारपासून

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवारपासून

googlenewsNext



कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा रविवार (दि. १ सप्टेंबर) पासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे. या सेवेबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.
कोल्हापूर-मुंबई या मार्गावर ‘उडान’ योजनेंतर्गत ‘एअर डेक्कन’ने गेल्या वर्षी विमानसेवा सुरू केली; पण अनियमिततेमुळे ती काही दिवसांतच बंद पडली; त्यामुळे स्लॉटही काढून घेतले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद आणि बंगलोर या मार्गांवर विमानसेवा सुरू झाली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. या मार्गावरील सेवांप्रमाणेच मुंबईला सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत राहिली.
लोकप्रतिनिधींसह उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनांनी पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील निविदा जाहीर केली. त्यात पात्र ठरल्यानुसार ट्रू-जेट कंपनीने १७ जुलैपासून सेवा सुरू करण्याची मागणी केली; पण, काही तांत्रिक अडचणींमुळे लांबलेला सेवाप्रारंभ आता रविवार (दि. १ सप्टेंबर)पासून होणार आहे. ‘एटीआर’ ७२ आसनी विमानाद्वारे ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाईन तिकीट विक्री सुरू आहे.

चांगला प्रतिसाद
गेल्या वर्षभरापासून बंद असणारी कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरू होत असल्याने आनंद आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेच्या तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कमीत कमी २२०० ते चार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर आहेत. साधारणत: ४० टक्क्यांपर्यंतची तिकीट विक्री झाली असल्याचे कोल्हापुरातील पर्यटनतज्ज्ञ व्ही. बी. वराडे यांनी मंगळवारी सांगितले.

Web Title: Mumbai-Kolhapur airline starting Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.