मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा सप्टेंबरपासून प्रारंभ, आॅनलाईन तिकीट विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:14 AM2019-08-16T11:14:31+5:302019-08-16T11:16:32+5:30
मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी दुपारचा स्लॉट मिळाला आहे. या सेवेसाठी आॅनलाईन तिकीट विक्रीची प्रक्रिया सुुरू झाली आहे.
कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूरविमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी दुपारचा स्लॉट मिळाला आहे. या सेवेसाठी आॅनलाईन तिकीट विक्रीची प्रक्रिया सुुरू झाली आहे.
गेल्यावर्षी ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्कनने कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू केली; मात्र अनियमिततेमुळे ती काही दिवसांतच बंद पडली; त्यामुळे स्लॉटही काढून घेतले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद आणि बंगलोर या मार्गांवर विमानसेवा सुरू झाली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. या मार्गावरील सेवांप्रमाणेच मुंबईला सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत राहिली.
लोकप्रतिनिधींसह उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनांनी पाठपुरावा केला. त्याची दखल केंद्र सरकारने ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील निविदा जाहीर केली. त्यात पात्र ठरल्यानुसार ट्रू-जेट कंपनीने १७ जुलैपासून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येणार होती; पण दुपारचा स्लॉट आणि आठवड्यातील तीन दिवसच सेवा असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची मागणी व्यापारी, उद्योजक, आदींनी केली.
त्यासह काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा प्रारंभ लांबला. लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सेवा पुरविण्याचे दिवस आता एकूण पाच झाले आहेत. स्लॉट मात्र दुपारच्या वेळेत आहे. सेवेचे दिवस वाढल्याचा कोल्हापूरकरांना उपयोग होणार आहे.
वेळ आणि तिकीट दर असा
मुंबईतून दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापुरात २ वाजून ५ मिनिटांनी येईल. येथून २ वाजून ३० मिनिटांनी जाणारे विमान मुंबईत ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. ‘एटीआर’ ७२ आसनी विमानाद्वारे सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी आॅनलाईन तिकीट विक्री गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे.
दोन हजार २५ रुपये ते चार हजार ९०० रुपयांपर्यंत तिकीटाचा दर आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होत असल्याचा आनंद असून, ती कोल्हापूरला उपयुक्त ठरणार असल्याचे पर्यटनतज्ज्ञ व्ही. बी. वराडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवेचे दिवस वाढले आहेत. या मार्गावरील सेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू होईल. सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- अमल महाडिक, आमदार.