मुंबईतील पावसामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसला तीन तास उशीर, कोयना एक्स्प्रेसही एक तास उशिरा धावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:06 PM2024-09-27T17:06:33+5:302024-09-27T17:06:50+5:30
कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस ...
कोल्हापूर : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या जाेरदार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल तीन तास उशिराने कोल्हापुरात पोहोचली.
बुधवारी रात्री ८ वाजता मुंबईतून महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूरकडे रवाना होणार होती. मात्र, दादरसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. परिणामी, मुंबईतील रेल्वे वाहतूक कोलमडली. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री उशिराने कोल्हापूरकडे रवाना झाली.
गुरुवारी सकाळी ही रेल्वे ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, मुंबईतूनच उशिरा निघाल्याने ही रेल्वे कोल्हापुरात १०:२५ ला पोहोचली. पावसामुळे कोयना एक्स्प्रेसही एक तास उशिरा धावली. बुधवारी रात्री पुण्यातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचाही परिणाम रेल्वेगाड्यांच्या वेगावर झाला. कोल्हापूर-पुणे या मार्गावरील रेल्वेसेवा मात्र सुरळीतपणे सुरू आहे.