मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी
By भीमगोंड देसाई | Published: November 29, 2022 07:48 PM2022-11-29T19:48:43+5:302022-11-29T19:56:44+5:30
महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे.
कोल्हापूर : कोणी काहीही शितोंडे उडवले तरी मी कोणासाठीही काम करीत नाही. महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी काम करतो. पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे सुरू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढविणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवरायांच्याबध्दलच्या क्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी काही लोकांना पद मिळाले पण पोच आली नाही, अशी खोचक टिप्पणी केली. राज्यात मंत्री असलेला एकजण महिला नेत्यांबद्दल वारंवार अपशब्द वापरतो, सांगलीतील एक भंपक आमदार असेच काहीतरी बरळत असतो. इतकी सद्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. अशा लोकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिध्दी देणे बंद केले पाहिजे, असाही सल्लाही त्यांनी दिला.
ठाकरे म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासूनचा अभ्यास केल्यास ९८ टक्के लोक आता मनसेत नवीन आहेत. मनसेही प्रस्थापितांविरोधात लढण्याची रणनीती करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी, काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तोही हालत असतो. मनसेने १९९५ आणि १९९९ साली अनेकांचे बालेकिल्ले हलवले होते. मुंबईतील जाहीर सभेत मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृतीची नव्हे तरी त्यांच्या प्रवृत्तीची चेष्टा केली होती. ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतरच सर्वांना भेटत आहेत. पदावर असताना का भेटत नव्हते, त्यावेळी आजारपणाचे कारण पुढे करून आता फुटलेल्या आमदारांनाही ते भेटले नव्हते, ही वस्तूस्थिती आहे.
सीमाप्रश्न आताच का ?
महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. राज्यपाल कोश्यारीही यासाठीच वक्तव्य करतात का ? याचाही शोध घेण्याची गरज आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. आताच सीमाप्रश्न उकरून काढणारे आणि कोश्यारी यांना कोणीतही स्क्रिप्ट देत असतील. त्यावरून ते बोलत असावेत, असा आरोप त्यांनी केला.
पूर्वीही जात होती पण...
पूर्वीही जात होती. पण आता दुसऱ्या जातींबद्दल व्देष पसरवला जात आहे. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात हे प्रयत्न होत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.