आयबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वीज बिलाच्या नावाने लाखोंचा गंडा

By मनीषा म्हात्रे | Published: November 12, 2023 08:35 PM2023-11-12T20:35:42+5:302023-11-12T20:36:29+5:30

Mumbai News: गुप्तचर यंत्रणा आयबीमधून सेवानिवृत्त झालेल्या ७२ वर्षीय अधिकाऱ्याला थकीत वीज बिलाच्या नावाने साडे सात लाखांना गंडविल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे.

Mumbai: Retired IB officer hit with electricity bill | आयबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वीज बिलाच्या नावाने लाखोंचा गंडा

आयबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वीज बिलाच्या नावाने लाखोंचा गंडा

मुंबई - गुप्तचर यंत्रणा आयबीमधून सेवानिवृत्त झालेल्या ७२ वर्षीय अधिकाऱ्याला थकीत वीज बिलाच्या नावाने साडे सात लाखांना गंडविल्याचा प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

मुलुंड परिसरात राहणारे तक्रारदार हे सेक्शन अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झालेले आहे. ९ नोव्हेंबरच्या दुपारी त्यांना एका अनोळखी नंबरवरुन मागील महिन्याचे वीज बिल अपडेट न झाल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याचा संदेश आला. या संदेशात देवेश जोशी नावाने एक संपर्क क्रमांक देण्यात आला होता. फिर्यादी यांनी त्या नंबरवर काॅल करुन वीज बिल भरले असल्याचे स्पष्ट केले. मात्र जोशी याने बिल भरलेले महावितरणच्या साईटवर दिसत नसल्याचे सांगत त्याने फिर्यादी यांना एक लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत मोबाईलवर आलेली लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र लिंक ओपन झाली नाही.

फिर्यादी यांनी पत्नीच्या मोबाईलवर लिंक पाठवून ओपन केली. त्यानंतर जोशी याने वीज बिल अपडेट करण्यासाठी त्यांना वीज बिलावरील ग्राहक क्रमांक आणि पत्नीचे नाव अशी माहिती भरुन अवघे पाच रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ही रक्कम भरताच त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या अनुक्रमे पाच लाख आणि दोन लाख रुपये अशा एकूण सात लाख रुपयांच्या बचत ठेवी (एफडी) मुदतीआधी बंद करुन रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग केल्याचे आणि खात्यातील ३५ हजार रुपयांतून ऑनलाईन खरेदी केल्याचे संदेश पत्नीच्या मोबाईलवर आले.

फिर्यादी यांच्या पत्नीने लगेचच बॅंकेत चाैकशी केली असता सायबर ठगाने त्यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन ही फसवणूक केल्याचे समजले. अखेर, फिर्यादी यांच्या पत्नीने ऑनलाईन सायबर क्राईम पोर्टलवर याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर, तक्रारदार यांनी पत्नीला सोबत घेऊन नवघर पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Mumbai: Retired IB officer hit with electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.