मुंबईचे दहशतवाद-विरोधी पथकाचे सुहास वारके कोल्हापूरचे नवे आयजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:57 AM2019-02-26T00:57:44+5:302019-02-26T00:58:47+5:30
कोल्हापूर : मुंबईचे दहशतवाद-विरोधी पथकाचे सुहास वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली, तर विश्वास नांगरे-पाटील यांची ...
कोल्हापूर : मुंबईचे दहशतवाद-विरोधी पथकाचे सुहास वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली, तर विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. औरंगाबादचे पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या नावाची चर्चा होती; परंतु त्यांची नांदेड परिक्षेत्रासाठी बदली झाली. याप्रकरणी रविवारी रात्री गृह विभागाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाला. वारके हे उद्या, बुधवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
नांगरे-पाटील हे गेली दोन वर्षे कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी होते. राज्यातील पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अशा २७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रविवारी गृह विभागाने काढले. त्यामध्ये नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी, तर त्यांच्या जागी सुहास वारके यांची बदली झाली. वारके हे मूळचे जळगावचे आहेत. त्यांचे शिक्षण प्रवरा मेडिकल कॉलेज पुणे-लोणी येथे झाले. सध्या ते मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाचा कार्यभार सांभाळत होते.
परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण असे पाच जिल्हे येतात. सोमवार-मंगळवार असे दोन दिवस मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पोलीस महासंचालकांसोबत आहे. हे सर्व अधिकारी उपस्थित असल्याने वारके उद्या, बुधवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.