आक्षेपार्ह चित्रांबाबत मुंबईची प्रदर्शन संयोजिका पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 04:07 PM2019-05-27T16:07:24+5:302019-05-27T16:12:55+5:30
आक्षेपार्ह चित्रांबाबत ‘द अनडिफिटेड सेकंड किंग आॅफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाच्या मुंबई येथील संयोजिका स्मृती शिरसाट यांना कोल्हापुरातील शिवभक्तांनी सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चित्रे रेखाटणाऱ्या चित्रकार दिपक विनोद प्रकाश गुप्ता यांना ताब्यात घेईपर्यंत पोलिसांनी संयोजिकेला सोडू नये. या कलाकाराने चित्रांतून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची मांडणी, बदनामी केली आहे. संबंधित कलाकाराने जाहीर माफी मागावी. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे संयोगिताराजे आणि इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर : आक्षेपार्ह चित्रांबाबत ‘द अनडिफिटेड सेकंड किंग आॅफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाच्या मुंबई येथील संयोजिका स्मृती शिरसाट यांना कोल्हापुरातील शिवभक्तांनी सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चित्रे रेखाटणाऱ्या चित्रकार दिपक विनोद प्रकाश गुप्ता यांना ताब्यात घेईपर्यंत पोलिसांनी संयोजिकेला सोडू नये. या कलाकाराने चित्रांतून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची मांडणी, बदनामी केली आहे. संबंधित कलाकाराने जाहीर माफी मागावी. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे संयोगिताराजे आणि इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील शाहू स्मारकभवनमध्ये मुंबईच्या आर्ट रिव्होल्युशनने चित्रप्रदर्शन भरविले होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्त, संभाजीराजेप्रेमींनी हे प्रदर्शन बंद पाडले.आक्षेपार्ह चित्रे ताब्यात घेतली. प्रदर्शनाच्या संयोजिका शिरसाट यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संयोगिताराजे यांनी भवानी मंडप येथील जुना राजवाडा येथे बोलविले.
यावेळी संयोगिताराजे, मंजुश्री पवार, प्राचार्य अजेय दळवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिरसाट यांना योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत माफी मागितली. संतप्त शिवभक्तांनी शिरसाट यांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. चित्रकार, संयोजिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवभक्तांनी केली.
यावेळी शहाजी माळी, संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील, विकी जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत संयोगिताराजे म्हणाल्या, या प्रदर्शनातील कलाकारांबाबतची माहिती देणारे पत्रक आणि उदघाटनाची निमंत्रण पत्रिका पाहता त्यामध्ये आक्षेपार्ह चित्रे असतील असे वाटले नव्हते. मात्र, काही शिवभक्तांनी प्रदर्शन पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांनी या आक्षेपार्ह चित्रांची माहिती दिली. त्यावर आम्ही तातडीने संबंधित चित्रे ताब्यात घेतली. अशा पद्धतीने कोणत्याही महापुरूषांची बदनामी करणे चुकीचे आहे. कलाकारांकडून असे पुन्हा होवू नये.
मंजुश्री पवार म्हणाल्या, या चित्रांतून छत्रपती संभाजीराजे यांचे शौर्य, पराक्रम, त्यांचे योगदान दाखविण्यात आलेले नाही. त्यांची बदनामी आणि प्रतिमाभंजन केले आहे. संबंधित कलाकाराने केवळ स्वत:ची प्रसिद्धी व्हावी याउद्देशाने अशी आक्षेपार्ह चित्रे काढली आहेत. चित्र रेखाटण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ वापरलेले नाहीत. संयोजिकेने देखील चूक झाल्याचे कबूल केले आहे.
अजेय दळवी म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, संंबंधित कलाकाराने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे. समाजमान्य महापुरूषाची आक्षेपार्ह चित्रे काढण्याची मोठी चूक केली आहे. कलाकारांनी जबाबदारीने कार्यरत रहावे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करावा
या प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण पत्रिकेवर संयोगीताराजे यांचे नाव परवानगी न घेता छापले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी मला या प्रदर्शनाची माहिती घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार मी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो. छत्रपती संभाजी महाराज यांचा स्त्री रूपात पुर्नजन्म झाला, तर ते कसे दिसतील, याबद्दलची आक्षेपार्ह चित्र या प्रदर्शनात दिसून आली, असे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी संगितले.
आक्षेपार्ह चित्रांचे हे प्रकरण गंभीर आहे. महापुरूषाची बदनामी करणाऱ्या संबंधित चित्रकार, संयोजिका यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. याबाबत आम्ही सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे. प्रदर्शनातील आक्षेपार्ह चित्रे शासनाने ताब्यात घ्यावीत, अशी आमची मागणी असल्याचे सावंत यांनी सांगितले.