‘कटर’च्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापूरला येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:14 PM2018-10-04T13:14:00+5:302018-10-04T13:20:36+5:30
नवी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खून प्रकरणात वापरलेले कटर मशीन हे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका तरुणाने पुरविल्याच्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या वास्तव्याची गोपनीय माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी घेतली आहे. तसेच कटरच्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापुरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
कोल्हापूर : नवी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या खून प्रकरणात वापरलेले कटर मशीन हे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील एका तरुणाने पुरविल्याच्या निनावी पत्राने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या वास्तव्याची गोपनीय माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी घेतली आहे. तसेच कटरच्या तपासासाठी मुंबईचे तपास पथक कोल्हापुरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील हा खून प्रकरणातील संशयित आहे. त्याचा जुना बुधवार पेठेतील तरुण मित्र आहे. अश्विनी बिंद्रे यांचे वडील जयकुमार बिंद्रे यांनी या निनावी पत्राची प्रत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना पाठविली आहे. संशयित तरुण गेल्या दोन वर्षांपासून फरार आहे. तो अचानक गायब झाल्याने संशय बळावला आहे.
यासंबंधी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे चौकशी केली असता निनावी पत्र आम्हाला मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत असल्याने ते पत्र त्यांना पाठविले आहे. परस्पर या गुन्ह्याचा तपास आम्हाला करता येत नाही. त्यांनी अद्याप आमच्याकडून कोणतीही मदत मागितलेली नाही.
तपासासाठी मदत मागितल्यास आम्ही ती देऊ, असे त्यांनी सांगितले; परंतु लक्ष्मीपुरी पोलिसांनी या तरुणाच्या वास्तव्याची व त्याचा बिंद्रे खून प्रकरणाशी काही संबंध आहे काय, याची गोपनीय माहिती घेतली आहे. त्याच्या कुटुंबीयांसह मित्र व शेजारील लोकांकडे चौकशी केली आहे. या पत्रानुसार मुंबईची तपास यंत्रणा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.