मुंबईच्या तोतया वकील महिलेचा ग्राहकांना गंडा घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:12 AM2019-06-02T03:12:00+5:302019-06-02T03:12:10+5:30
कोल्हापूर पोलिसांनी घेतले ताब्यात : फसवणुकीचा गुन्हा दाखल
कोल्हापूर : कर्ज देण्याच्या आमिषाने अनेकांकडून कडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या मुंबईतील तोयया वकील महिलेस शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी ती पळून जाण्याच्या प्रयत्नात होती.
भक्ती भास्कर सुर्वे (रा. मूळ कांदिवली पूर्व, सध्या रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे त्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिच्याकडून तिने कर्जदारांकडून घेतलेले कोरे धनादेश, कर्जदारांच्या फोटोसह महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली.
उच्च न्यायालयात वकील असल्याचे खोटे सांगून कोल्हापुरातील कसबा बावड्यात महिन्यासाठी तिने घर भाड्याने घेतले. त्या घराबाहेर कर्जे मिळवून देण्याबाबत संस्था काढून फलक लावला. कागदपत्रे व धनादेश जमा करण्यासाठी काही तरुणांची नियुक्ती केली. प्रारंभी तिने कर्जासाठी कागदपत्रे, स्वाक्षरी केलेले दहा धनादेश घेतले. कर्जमंजुरीच्या नावाखाली खोटे धनादेश देऊन लाखाला २० हजार याप्रमाणे कमिशन घेऊन ती पळून जाण्याच्या तयारीत होती. तिने कामावर ठेवलेल्या तरुणांना याबाबत शंका आली. त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
जिल्हा न्यायालयातही तिचा वावर
भक्ती हिने वकील असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून घेतले होते. वकिलासारखी वेशभूषा करून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत तिचा वावर होता. तिने १२ मेपासून मुंबईतील ‘सुधीर’ नावाच्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या फर्मची वकील असल्याचे भासविण्यास सुरुवात केली. त्याद्वारे तिने अॅडव्होकेट सुधीर नावाने जाहिरात फलक छापून घेतला. संस्थेमार्फत व्यवसायासाठी व पर्सनल एक ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळवून देऊ, असे सांगण्यास सुरुवात केली.